मास्क वापरण्यासोबत सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक

मास्क वापरण्यासोबत सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, मास्क वापरण्यासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. दरम्यान मुख्य कोरोना नियंत्रण कक्ष, बेड व्यवस्था, अॅम्ब्युलन्ससह संपूर्ण आरोग्य यंत्रणा तात्काळ पूर्ववत करण्याचे आदेशही महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोविड 19 रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढत आहे. नागरिक रस्त्यावर, दुकानांमध्ये, भाजीपाला दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर नागरिकांची रस्त्यावरील वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नागरिकांकडून सोशल डिस्टन्सचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर शहरात वावरताना मास्क वापरण्यासोबत सोशल डिस्टिंग पाळणे बंधनकारक करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्याचबरोबर शहरातील सार्वजनिक ठिकाणी, मार्केट परिसरात मास्क वापरणे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

गेल्या काही महिन्यात महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे. परंतू सद्यस्थितीत प्रमुख रस्ते, बाजारपेठा, मार्केट तसेच प्रवासादरम्यान नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने कोरोनाचा संसर्ग हळू हळू वाढत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेवून महापालिकेचा मुख्य कोरोना नियंत्रण कक्ष, बेड व्यवस्था, अॅम्ब्युलन्ससह संपूर्ण आरोग्य यंत्रणा तात्काळ पूर्ववत करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत.

First Published on: February 18, 2021 8:38 PM
Exit mobile version