भिवंडीतील वादळग्रस्त भागाची कपिल पाटील यांच्याकडून पाहणी

भिवंडीतील वादळग्रस्त भागाची कपिल पाटील यांच्याकडून पाहणी
 भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरात अचानक मंगळवारी आलेल्या वादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची घरे, शाळांची केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज पाहणी केली. सरकारच्या सध्याच्या नियमापेक्षा आपद्गग्रस्तांना जास्त मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले

भिवंडी तालुक्यातील परिसरातील बोरिवली, वाफाळे, दळेपाडा, कुरुंद आदींसह पाच ते सहा गावांना अचानक वादळी वाऱ्याचा फटका बसला. अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. तसेच घरांचे नुकसान झाले. काही शाळांच्या वर्गाचेही नुकसान झाले. या भागाची केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज उपविभागीय अधिकारी अमित सानप यांच्यासह पाहणी केली. त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना तातडीने पंचनामे पूर्ण करण्याची सूचना केली. नुकसान झालेल्या प्रत्येक घराचा पंचनामा केला जाईल, अशी ग्वाही कपिल पाटील यांनी ग्रामस्थांना दिली.

काही दिवसांतच पावसाला सुरूवात होणार आहे. मात्र, कालच्या वादळामुळे बहूसंख्य घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्याच्या शासकीय नियमानुसार मिळणारी नुकसानभरपाईतून घरदुरुस्ती होणार नाही. आपद्गग्रस्त ग्रामस्थांना दिलासा मिळावा, यासाठी सध्याच्या नियमात बदल करून जादा मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केली आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.

First Published on: May 31, 2023 10:42 PM
Exit mobile version