कर्नाटकच्या विजयाची पुनरावृत्ती सर्व राज्यात होणार

कर्नाटकच्या विजयाची पुनरावृत्ती सर्व राज्यात होणार

ज्या दिवशी राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यादिवशी शिंदे- फडणवीस सरकार पडेल, याच  भीतीने मंत्रिमंडळ विस्तार होत नाही.एका मंत्र्याला चार पाच जिल्हे पालकमंत्री म्हणून काम पाहावे लागत आहे. अशा प्रकारे कधी सरकार चालते का ? हिंमत असेल तर निवडणुका घ्या,जसे कर्नाटक मधून जनेतेने भाजपाला नाकारले तसेच देशाच्या सर्वच राज्यात आगामी निवडणुकांमध्ये घडणार असल्याचा विश्वास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

कॉंग्रेसच्या मानवाधिकार विभागाच्यावतीने गुरुवारी सायंकाळी डोंबिवलीतील सर्वेश हॉल मध्ये स्व.राजीव गांधी पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डोंबिवलीतील रस्ते आणि कचरा आदी दुरावस्था पाहून नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला . ठाणे जिल्हात आदिवासी भागात लोकांना रस्ता नाही,पिण्याचे पाणी नाही.आरोग्य व्यवस्था नाही. दुसरीकडे शहरी भागात सोयीसुविधा नाहीत. मुंबईजवळील हे ठाणे जिल्ह्याची ही अवस्था आहे. या शहरातील व जिल्ह्यातील अनेकांना मोठी सत्ता पद मिळाल्यावर देखील ते चांगले काम करू शकले नाहीत,असेच यातून स्पष्ट दिसून येते, असा टोला पटोले यांनी  मुख्यमंत्री व स्थानिक मंत्र्यांना लगावला आहे.

संसदीय मूल्य जोपासले पाहिजे हे राज्यकर्त्याना समजत नाही. राष्ट्रपती हे देशाचे ,लोकसभेचे आणि राज्यसभेचे प्रमुख असतात.राष्ट्रपती पद हे संविधनिक सर्वात मोठे पद आहे.केबिनेट निर्णयाची मान्यता राष्ट्रपतीकडून घेतली जाते. तरीही नवीन संसद भवन इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान करीत आहेत. राष्ट्रपतींना डावलले जात असल्याने सर्व पक्ष एकत्र यावे, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. देशात लोकशाही मजबूत करण्याचे काम संविधानने केले आहे.मात्र संविधानच संपविण्याचे काम होत असेल तर विरोध केला पाहिजे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींची तानाशाही सुरु आहे. काँग्रेसने जनतेचे आशीर्वाद घेऊन देशाला पुढे नेण्याचे काम केले.काँग्रेसने इतकी वर्ष देशात ज्या चांगल्या बाबी बनवल्या , ते विकून देश चालविण्याचे काम हे सरकार करत आहे असा आरोप पटोले यांनी केला. २०१४ व २०१९ ची कथा सांगायची गरज नाही.कर्नाटक निवडणुकीत जनतेने काँग्रेसचा विजय केला. देशात निवडणुका घ्या, आता जनताच भाजपाची पुरती घमंड उतरेल. दोन हजाराची नोट बंद केली ,ती बदलण्यासाठी जनतेला पुन्हा रांगेत उभे केले जात आहे . आता नोट बदलणारा पंतप्रधान बदलायचा असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे . या कार्यक्रमास नाना पटोले, खा. कुमार केतकर, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, प्रदेश प्रतिनिधी पोली जेकब, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आदी उपस्थित होते.

First Published on: May 26, 2023 10:29 PM
Exit mobile version