Corona Update: कल्याण-डोंबिवलीत अंशतः लॉकडाऊन; KDMC ने जाहीर केलं वेळापत्रक

Corona Update: कल्याण-डोंबिवलीत अंशतः लॉकडाऊन; KDMC ने जाहीर केलं वेळापत्रक

कल्याण-डोंबिवली क्षेत्रात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. कोरोनाचा कहर वाढल्याने प्रशासनाने कोरोना संदर्भातील नवे निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या महामारीला तोंड देण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज केले. महापालिका क्षेत्रात मोठया प्रमाणात रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे सोशल डिस्टन्सिग , मास्कची कारवाई अधिक तीव्र करणेबाबत सुचना दिल्या असून गुरूवापासून काही निर्बंध लागू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

KDMC ने जाहीर केलं वेळापत्रक

अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने सकाळी ७ ते सायं. ७ या वेळातच सुरु राहतील. शनिवार, रविवार पी १, पी २ प्रमाणे दुकाने उघडी राहतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. वडापावच्या गाडया, चायनिजच्या गाडया येथे लोक नियमांचे उल्‍लंघन करत असल्याने त्यांना यापुढे सायं. ७ वाजेपर्यंतच परवानगी देण्यात येणार आहे. भाजी मंडई देखील ५० टक्के क्षमतेने चालू राहतील. लग्न, हळदी समारंभ यावर कडक निर्बंध घालण्यात येत असून शासनाच्या नियमांचे उल्‍लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. बार, रेस्टॉरंट आता रात्री ११ वाजेपर्यंतच उघडी राहतील, आठवडी बाजार पूर्णपणे बंद राहतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

कल्याण-डोंबिवली क्षेत्रात आज बुधवारी पुन्हा कोरोनाचा कहर पाहायला मिळाला. कल्याण डोंबिवली क्षेत्रात आज सर्वाधिक कोरोना बाधित ३९२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आहे. त्याचप्रमाणे होम आयसोलेशन मधील रुग्ण बाहेर फिरतांना आढळल्यास त्याचेवरही कारवाई करण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.

First Published on: March 10, 2021 8:11 PM
Exit mobile version