ठाण्यात सरसकट लॉकडाऊन नाही

ठाण्यात सरसकट लॉकडाऊन नाही

एका शासन निर्णयाने महापालिकेची ३६०० पदे रिक्त

ठाणे महापालिका क्षेत्रात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र असणार्‍या ठिकाणीच निर्बंध घालण्यात आले असून शहरात कोणत्याही प्रकारे सरसकट लॉकडाऊन करण्यात आलेला नाही तरी ठाणेकरांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. अवघ्या काही तासात ठाणे महापालिकेने घुमजावपणा केल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी रात्री ठाणे महापालिकेने ज्या-ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. असे हॉटस्पॉट शोधून ठामपा हद्दीतील सात प्रभाग समितीमधील १६ हॉटस्पॉटमध्ये ३१ मार्चपर्यंत अंशत: लॉकडाऊन घोषित केला होता.

सध्या महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. वाढता संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत. ज्या परिसरात कोरोनाचा संसर्ग जास्त आहे. त्या परिसरात हॅाटस्पॅाटची निर्मिती करण्यात आली आहे. या हॅाटस्पॅाट क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी कोविड १९ चे रुग्ण सापडले आहेत त्या ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले आहेत.

या सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रामध्येच निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग आहे ती इमारत, त्या इमारतीमधील मजला तिथेच ३१ मार्च २०२१ पर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. उर्वरित ठिकाणचे सर्व व्यवहार यापूर्वी जसे सुरू होते, त्यानुसार सुरू राहतील असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहरात कोणत्याही प्रकारे सरसकट लॉकडाऊन करण्यात आला नसून ज्या आस्थापना सुरु आहेत त्या आस्थापना यापुढेही सुरू राहणार आहेत. तरी ठाणेकरांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. तसेच नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर आणि मास्कचा वापर करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

First Published on: March 10, 2021 5:30 AM
Exit mobile version