पोलिस पाटलांचे मुंबई ठाण्यात स्थलांतर

पोलिस पाटलांचे मुंबई ठाण्यात स्थलांतर

मुरबाड । तालुक्यातील 207 गावातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि अवैध प्रकारांवर नजर ठेवण्यासाठी शासनाने प्रत्येक गावात पोलीस पाटलांची सुमारे सात ते दहा हजार मानधनावर नियुक्ती केली आहे. या पोलीस पाटलांना दरमहा गावातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा स्थानिक पोलीस स्टेशनला देणे सक्तीचे असले तरी अनेक पोलीस पाटील हे स्थानिक ठिकाणी वास्तव्य न करता ते मुंबई ठाणे आदी शहरी भागात वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्था वार्‍यावर असल्यासारखी स्थिती आहे.

ग्रामीण भागातील पोलिस पाटील हे पद नागरिक आणि पोलीस स्टेशन यातील दुवा समजले जाते. त्यांच्यावर गावातील कायदा सुव्यवस्थेची महत्वाची जबाबदारी असते. गावात कोणत्याही प्रकारचा वादविवाद निर्माण झाला तर तो जेणेकरून तेथेच मिटविला जावा, तसेच गावातील बेकायदा उद्योग नियंत्रणात रहावे यात पोलीस पाटील महत्वाची भूमिका बजावतात. सरकारकडून पोलीस पाटलांना सन्मानासोबतच मानधन मिळते. मात्र मुरबाड तालुक्यातील सुमारे 207 गावात पोलीस पाटील कार्यरत असले तरी अनेक पोलीस पाटील हे स्थानिक ठिकाणी वास्तव्य न करता ते मुंबई ठाण्यासारख्या शहरी भागात वास्तव्य करत आहेत. यातील काही शासकीय नोकरी देखील करतात. त्यामुळे ग्रामीण भागात गावठी, देशी मद्य, ताडी, गुटखा, जुगार आदी अवैध धंद्यांना सुगीचे दिवस आले आहेत. तसेच सध्या तरुण पिढीला क्रिकेट आणि बैलगाडा शैर्यतीने पछाडले असून त्यातही बेकायदा प्रकार होत आहेत. ग्रामीण भागात काला पिला पाकोळी हे जुगार सुरू आहेत. यातून पैशांसाठी गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे पोलीस पाटील यांनी संबंधित गावातच राहावे त्यासाठी मानधन वाढवण्याची मागणीसोबत संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे.

गावचे पोलीस पाटील गावात वास्तव्य न करता शासनाचे मानधन घेत असतील तर ही गंभीर बाब आहे.त्याची चौकशी केली जाईल.
-रामदास दौड, उप विभागीय अधिकारी कल्याण

पोलीस पाटलांना गावातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शासन मानधन देते.परंतु ते गावात वास्तव्य न करता शासनाचे मानधन घेत असतील तर याचा विचार व्हायला हवा.
-पोलीस पाटील संघटना अध्यक्ष

First Published on: March 21, 2024 10:20 PM
Exit mobile version