ठाणे जिल्हयातील दारु अड्डयांवर उत्पादन शुल्क विभागाचे सामुहिक छापे

ठाणे: आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाईला सुरवात केली.. बुधवारी एकाच दिवसात कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली ठाणे आणि मुंबईच्या ४० अधिकाऱ्यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत गावठी दारुसह ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये दोघांना अटक केली आहे.
उपायुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे, मुंबई उपनगरचे अधीक्षक नितीन घुले यांच्यासह कल्याण, ठाणे आणि मुंबईतील उपअधीक्षक, निरीक्षक आणि दुय्यम निरीक्षक अशा तब्बल ४० अधिकाऱ्यांच्या चमूने २० मार्च २०२४ रोजी सकाळी ७ ते दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान खर्डी, दिवा खाडी परिसर, आलीमघर, सरळांबे, वाशाळा, अंजूर, छोटी देसाई, मोठी देसाई, आगासन, घेसर, द्वारली पाडा, माणेरागाव, कुंभार्ली, केवणी, कालवार, कारीवली, केशवसृष्टी आदी ३० ठिकाणी हे धाडसत्र राबवले. या धाडीमध्ये बेकायदेशीरपणे गावठी दारु निर्मिती आणि विक्रीचे ३० गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये २६ अड्डे बेवारस असल्याचे आढळले. यात दोघांना अटक केली असून दोघे फरार झाले. गावठी दारु निर्मितीसाठी लागणारे ८९ हजार ४८० लीटर रसायन, १०५ लीटर गावठी दारु असा ३३ लाख ९३ हजार १८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

डोंबिवलीत दारू बनविण्याच्या ठिकाणी पोलिसांचा छापा
डोंबिवली पूर्वेतील कोळेगाव परिसरात बनावट देशी दारू बनविण्यात येत होती.तेथे छापा टाकून मानपाडा पोलिसांनी ३५ लिटर दारूने भरलेला ड्रम नाल्यात ओतून टाकला व दारू बनवण्याचे साहित्य देखील नष्ट करण्याची कारवाई केली .याप्रकरणी दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या नीलेश पाटील (२६) याच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे पोलिस आयुक्तांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अवैध दारू, ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांच्या विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशावरून मानपाडा पोलिसांचे पथक शहरातील अवैध धंद्यांवर धडक कारवाई करत होते.यावेळी पोलीस शिपाई प्रशांत आंधळे यांना कोळेगाव येथील समाधान हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या नाल्याजवळ देशी दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाली होती. आंधळे व त्यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली.या कारवाईत पोलिसांनी ३५ लिटर दारूने भरलेला ड्रम नाल्यात ओतून देत दारू बनवण्याचे साहित्य नष्ट केले.

 

First Published on: March 20, 2024 9:21 PM
Exit mobile version