बदलापूरमध्ये गॅरेजला भीषण आग 

बदलापूरमध्ये गॅरेजला भीषण आग 
बदलापूर काटई रस्त्यावर चार चाकी वाहनाच्या गॅरेजला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र गॅरेजचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बदलापूर काटई रस्त्यावर डी मार्टलगत कार गॅरेज आहे. या गॅरेजला आज सकाळी साडे सातच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत गॅरेजमधील अंदाजे १२कार जळून खाक झाल्यात. ही आग इतकी भीषण होती की गॅरेजमध्ये असलेल्या सीएनजी गाड्यांचा या आगीत स्फोट झाला. तर गॅरेजच्या वरच्या बाजूला असलेली उच्चदाब विद्युत वाहिनी देखील आगीच्या झळांमुळे तुटली. त्यामुळे काही काळ विद्युत पुरवठा देखील ठप्प झाला होता. महामार्गाला खेटून असलेल्या गॅरेजला आग लागल्याने काही काळ महामार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात आली होती. अंबरनाथ, बदलापूर आणि अंबरनाथ एमआयडीसीतील अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. तब्बल अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर तीन अग्निशमन दलाची वाहने आणि दोन खाजगी टँकरच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीत वाहनांचे मोठे नुकसान झाले असेल आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अजूनही अस्पष्ट आहे.
फायर ऑफिसर नाईट ड्रेसवरच
ही आग लागल्यानंतर बदलापूर अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनवणे हे नाईट ड्रेसवरच घटनास्थळी दाखल झाले. झाले असे की सोनवणे हे त्यांच्या मुलीला शाळेत सोडायला आले होते. त्याचवेळी रस्त्यालगत गॅरेजला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे थोडाही वेळ वाया  न घालवता, त्यांनी कर्मचाऱ्यांना फोन करून तातडीने घटनास्थळी बोलावले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आपल्या सुरक्षेची काळजी न घेता जबाबदारीने त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले.
First Published on: March 1, 2023 10:56 PM
Exit mobile version