पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आमदार राजू पाटील यांचे आश्वासन

पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आमदार राजू पाटील यांचे आश्वासन

राजू पाटील मनसे आमदार

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्षेत्र कार्यालयावर रिंग रुट रस्त्यांमध्ये घरे जाणाऱ्या आंबिवली अटाळी मांडा टिटवाळा येथील ८९० कुटुंबियांनी आपल्या परिवारासह बेमुदत साखळी उपोषण सुरू केले होते. मनसे आमदार राजू पाटील यांनी या उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांना आयुक्तांची भेट घेऊन पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वसन दिल्याने बाधितांनी उपोषण मागे घेतले. या बाबत अ प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांनी सांगितले की, उपोषणाबाबत आयुक्तांना माहिती दिली असून आयुक्त जो निर्णय घेतील त्यानुसार उपोषणकर्त्यांबरोबर चर्चा करून तोडगा काढण्यात येईल.

रिंगरुट या रस्त्यामध्ये अटाळी आंबिवली मांडा टिटवाळा येथील ८९० घरांवर तोडक कारवाई करण्यासाठी अ प्रभाग क्षेत्र कार्यालयाकडून बाधितांना घरे खाली करण्यासंदर्भात नोटीस पाठविण्यात येत आहेत. आत्तापर्यंत ८९० कुटुंबियांना नोटीस पाठवून झाल्या असून कारवाई करण्यासाठी प्रभाग कार्यालयातून सातत्याने दबाव येत आहे. त्यामुळे येथील नागरिक भयभीत झाले असून आपल्या हक्काचे घर रस्त्यात बाधित होत असल्याने हवालदिल झाले आहेत. बाधितांनी थेट प्रभागक्षेत्र कार्यालयासमोर भर उन्हात आपल्या लहान मुलांसह तसेच कचऱ्याच्या गाडीजवळ दुर्गंधीयुक्त जागेत उपोषण सुरू केले होते.

आम्ही पै पै जमा करून दागिने मोडून नातेवाईक आणि सावकाराकडून कर्ज घेऊन बिल्डरकडून घर घेतले आहे. आम्हाला जर घर मिळाले नाही तर आम्ही गोरगरिबांनी कोणाकडे न्याय मागायचा, घराच्या बदल्यात आम्हाला घर पाहिजे. आमच्या घरावर कारवाई करण्यासाठी आमच्यावर दबाव टाकला जात आहे. परंतु बिल्डरांवर कारवाई होत नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. संध्याकाळी मनसे आमदार राजू पाटील यांनी अ प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या दालनात रिंग रुट मध्ये घरे बाधित होणाऱ्या उपोषणकर्ते शिष्टमंडळासह धडक दिली. त्यावेळी बाधितांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावरून अधिकार्यांना जाब विचारला. तसेच मनपा आयुक्तांची दोन दिवसात भेट घेऊन पुनर्वसन प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगत उपोषण मागे घेण्यास सांगितले.

First Published on: February 17, 2021 9:27 PM
Exit mobile version