ठाण्यात होणार ’नमो महारोजगार’ मेळावा

ठाण्यात होणार ’नमो महारोजगार’ मेळावा

ठाणे : कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत बेरोजगार युवक तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी हायलॅण्ड ग्राऊंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे (पश्चिम) येथे कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक युवक व युवतींकरता ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली या नमो महारोजगार मेळाव्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सर्व तयारी केली जात असून विविध विभागांमार्फत करण्यात येत असलेल्या विविध कामांचा आढावा अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी घेतला.

या मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी आज (07 फेब्रुवारी) महापालिकेतील विविध विभागांच्या विभागप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मेळाव्याच्या ठिकाणी संपूर्ण स्वच्छता करणे, धूर व औषधफवारणी करणे, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था तसेच मेळाव्यासाठी उपस्थित राहणार्‍यांसाठी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था, बसेस उपलब्ध करणे, विद्युत व्यवस्था, अग्निशामक सुविधा तसेच वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देणेबाबतच्या सूचना अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी संबंधितांना दिल्या. यावेळी उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, वर्षा दिक्षीत आदी उपस्थित होते. या नमो महारोजगार मेळाव्याकरिता जास्तीत जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याकरिता कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी,महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय तसेच उद्योग व कामगार विभाग यांना विविध कंपन्याशी संपर्क साधून रिक्त पदे अधिसूचित जाहीर करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.
या माध्यमातून दोन लाख युवक आणि युवतींना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर, रायगड,सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी संबंधित जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी किंवा 1800 120 8040 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

First Published on: February 8, 2024 10:26 PM
Exit mobile version