दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक

भिवंडी । निजामपुरा पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीतील तिघा जणांना अटक केली. त्यांच्या जवळून गावठी कट्टा जिवंत काडतूस सुरा अशी हत्यारे जप्त करण्यात आली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन दोन गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी झाले असल्याची माहिती निजामपुरा पोलिसांनी बुधवारी दिली. निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही गुन्हेगार ऑटो रिक्षातून संशयित पणे फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष अव्हाड आणि पोलीस निरीक्षक दिपक शेलार (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जगदीश गिते तसेच अंमलदार सुशिलकुमार धोत्रे, निळकंठ खडके, इब्राहिम शेख,सांबरे यांनी पहाटे चार वाजताच्या सुमारास कांबे रस्त्यावरील तळवलीनाका परिसरांतील तलावाच्या बाजुला पाळत ठेवली असता तेथून अंधारातून एक संशयित ऑटो रिक्षा भरधाव वेगाने जाताना दिसली. पोलिसांनी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु ती भरधाव निघून जाताना काही अंतरावर पोलिसांनी पाठलाग करून रिक्षा थांबवली. त्या वेळी दोन संशयित अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळून गेले. तर नईम जमाल अहमद सय्यद (19),सुफियान भद्रेआलम अन्सारी (१९) सोहेल सनाउल्ला शेख (26) वर्षे या भिवंडी शहरात राहणार्‍या तिघा संशयितांना ताब्यात घेतले. अंगझडतीत एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस, एक एअर गन, सुरा, मिरची पावडर असे साहित्य आढळून आल्याने या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. विशेष म्हणजे या तिघा सराईत गुन्हेगारांवर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्ह्यांची नोंद असून सुफियान अन्सारी यास 12 मार्च पासून हद्दपार केले आहे. असे असताना हे सराईत गुन्हेगार दरोडा घालण्याच्या तयारीत भिवंडी शहरात फिरत होते.

First Published on: April 10, 2024 8:04 PM
Exit mobile version