प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न

ठाणे : भारत देश युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. आजचे युवक हे कोणत्याही कल्पना प्रत्यक्षात आणू शकतात, त्यांच्यात समतावादी समाजाच्या निर्मितीची क्षमता आहे. यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे, प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी गुरुवारी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात केले. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त साकेत मैदान येथील पोलीस क्रीडा संकुलात जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांना ते संबोधित करत होते.

आमदार संजय केळकर, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, ठाणे शहर पोलीस आयुक्त जय जित सिंह, जिल्हा पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुषमा सातपुते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते. यावेळी माजी सैनिक व कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते गजानन जगन्नाथ माने पद्मश्री यांना पद्मश्री मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान रामदास भाऊ भोगाडे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. विविध शासकीय विभागात उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आपदा मित्र प्रशिक्षण घेतलेल्यांना यावेळी आपदा मित्र प्रमाणपत्रांचे वितरणही जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या हस्ते करण्यात आले.

ठाणेकर नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन शिनगारे म्हणाले की, आज संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. कोरोनानंतर प्रथमच मुक्त वातावरणात हा दिवस आपण साजरा करत आहोत. भारतीय संविधानामुळे प्रत्येक भारतीयास भेदभावाशिवाय समान हक्क-अधिकार मिळाले आहेत. संविधानाची रचना ज्या तत्वांवर करण्यात आली होती त्याचे स्मरण करणं आवश्यक आहे. संविधानातील मूल्यांना आपल्या जीवनात स्थान देऊन संविधान अधिक बळकट करण्याचं ध्येय ठरवू या.

ठाणे जिल्ह्याची ओळख साहित्यिक, सांस्कृतिक आणि स्वातंत्र्यसंग्रामात अनमोल असे योगदान दिलेला जिल्हा म्हणून कायम राहिली आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यामध्ये विविध शासकीय योजनांमध्ये लोकसहभाग कायम राहिलेला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आपल्या देशाला सदैव सुजलाम सुफलाम ठेवण्यासाठी, आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी आणि जागतिक स्तरावर नावलौकिक आणखी वाढविण्यासाठी आपण सर्वजण योगदान देऊया. प्रजासत्ताक दिनाच्या या ऐतिहासिक दिवशी आज आपण सर्व जण भारतीय राज्यघटनेतील सर्व कर्तव्य तंतोतंत पाळण्याचा, खऱ्या अर्थाने भारतीय नागरिक होण्याचा संकल्प करु या, असे आवाहनही जिल्हाधिकारी शिनगारे यांनी यावेळी केले.

यावेळी झालेल्या संचलनात १६ पथके सहभागी झाली होती. ठाणे ग्रामीण पोलीसच्या अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी संचलनाचे नेतृत्व केले. दुय्यम परेड कमांडर पोलीस निरीक्षक तिलकचंद कांबळे होते. राज्य राखीव पोलीस बल गट क्र ११, ठाणे पोलीस आयुक्तालयाचे पोलीस मुख्यालय पथक, ठाणे ग्रामीण पोलीस, शहर परिमंडळ पोलीस, महिला पोलीस पथक, दंगल नियंत्रण पथक, शहर वाहतूक पोलीस, गृहरक्षक दल, प्रादेशिक कार्यालय, ठाणे महानगरपालिकेचे सुरक्षा महिला व पुरुष, स्काऊट गाईड, पोलीस बँड पथक, अग्निशमन दल, एनसीसी कॅडेट आदी पथके या संचालनात सहभागी झाली होती. तसेच वाहतूक शाखेचे चित्ररथ, दंगल नियंत्रण वाहन, वरुण वाहन, अग्निशमन वाहन, सामाजिक वनीकरण विभागाचे योजनांचे वाहन, ठाणे परिवहन सेवेतील इलेक्ट्रिक बस, जिल्हा रुग्णालयाचे रुग्णवाहिका आदीही संचलनात सहभागी झाले होते.

First Published on: January 26, 2023 1:21 PM
Exit mobile version