मुरबाडमध्ये तीव्र पाणी टंचाई

मुरबाडमध्ये तीव्र पाणी टंचाई

मुरबाड । मार्च महिन्याच्या तळपत्या उन्हाच्या चटक्यासोबत नदी नाले, विहिरी आणि मोठ्या जलाशयांनी तळ गाठले आहेत. त्यातच जलजीवन योजनेच्या १८३ योजनांपैकी फक्त १२ योजनाच पूर्ण झाल्याने तालुक्यातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. जल जीवन मिशनच्या योजना गेल्या कुठे? हा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सरकारने सर्वसामान्य नागरिकांची तहान भागविण्यासाठी ‘हर घर नल, हर घर जल ’ ही संकल्पना राबविण्यासाठी जल जीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक गावात कोट्यवधी रुपयांच्या पाणी पुरवठा योजना हाती घेतल्या. त्या योजना सुरू करण्यासाठी डिसेंबर 2022 मध्ये कार्यारंभ आदेश दिले. त्या पूर्ण करण्यासाठी डिसेंबर 2023 पर्यंत एक वर्षाची मुदत दिली होती. परंतु सुमारे 183 योजनांची कामे केवळ चार ते पाच ठेकेदारांना देण्यात आली असल्याने पाणी पुरवठा विभागाने संबंधित ठेकेदारांकडे पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्र सामुग्री आहे की नाही याचा विचार केला नाही.

ठेकेदाराने अनेक कामांची सुरुवात केवळ खड्डे खोदून केली आहे. तर काही ठिकाणी पाईप लाईन देखील टाकलेली नसताना पन्नास टक्के बिले पदरात पाडून घेतली आहेत. अशा 183 योजनांपैकी फक्त न्हावे, मांदोशी, वनोटे, नागाव, खेड, आसोसे, शिरपूर, कान्हार्ले, ठुणे, न्याहाडी, महाज कोलठण या 12 योजना पुर्ण झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित ठेकेदारानी कागदी घोडे नाचवून केवळ कोट्यावधी रुपयांची बिले काढली की काय? अशी चर्चा आहे. दरम्यान करचोंडे, कुडशेत, बांगरवाडी, मोहघर, म्हसा,सासणे,तागवाडी,पांडुरंगाची वाडी,गुमाळवाडी,शिंदे झाप, कळभांड, दुर्गापूर, वाघवाडी, दांडवाडी, मोहोपवाडी,चिंचवाडी,गोड्याचा पाडा,विढेपाडा या गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांनी किमान टँकरने तरी पाणी पुरवठा करावा, अशी विनंती पंचायत समितीकडे केली आहे.

First Published on: March 19, 2024 10:37 PM
Exit mobile version