पंचायत समितीचे आदर्श शिक्षक पुरस्कार

पंचायत समितीचे आदर्श शिक्षक पुरस्कार

मुरबाड पंचायत समिती मार्फत दिले जाणारे तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार या वर्षी अकरा शिक्षकांना देण्यात आले. यामध्ये दुर्गम डोंगराळ आदिवासी भागात सलग छत्तीस वर्षे सेवा बजावणाऱ्या एका आदिवासी शिक्षकाला सुद्धा आमदार किसन कथोरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि शिक्षण समिती सभापती सुभाष पवार ,पंचायत समितीच्या सभापती स्वराताई चौधरी आदी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

मुरबाड पंचायत समितीने अकरा गटातील अकरा शिक्षकांची तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड केली होती. शुक्रवारी मुरबाड येथे झालेल्या भव्य अशा कार्यक्रमात या अकरा पुरस्कर्ते शिक्षकांना अत्यंत देखण्या पध्दतीने पुरस्कार वितरित करण्यात आले. यावेळी आमदार किसन कथोरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की जिल्हा परिषदेने शिक्षकांना त्यांच्या शाळेच्या परिसरात राहणे बंधनकारक केले आहे.

ही अट जाचक असून ती रद्द करण्यासाठी मी ग्रामविकासमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे. त्याचप्रमाणे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना बक्षीस म्हणून एक महिण्याचे वेतन द्यायला पाहिजे. शिक्षकांच्या शिक्षकभवन बांधणीसाठी मी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी अंजली रमेश घायवट, संगीता कृष्णा विशे, शैलेश हरीभाऊ इसामे, मिनाक्षी पुरूशोत्तम जोगी, अस्मिता अजय देशमुख,संजय लक्ष्मण घरत, भगवान लक्ष्मण घुडे, नारद शिवाजी पडवळ, अश्विनी नरेश यशवंतराव, दरिया कासीमसाब शेख आणि अपंग शिक्षक रघुनाथ मारूती रोंगटे यांना आदर्श शिक्षक म्हणून गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी अनेक मान्यवर व शेकडो शिक्षक व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

First Published on: November 18, 2022 10:36 PM
Exit mobile version