जनता हीच माझी ऊर्जा, जनतेची सेवा हेच माझे ध्येय- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जनता हीच माझी ऊर्जा, जनतेची सेवा हेच माझे ध्येय- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे । जनतेला भेटल्यानंतर मला काम करण्याची ऊर्जा मिळते. जनतेची सेवा या ध्येयानेच मी काम करीत आहे. यासाठीच सरकारच्या माध्यमातून जनतेला उत्तम दर्जाची आरोग्य सेवा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केले. मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील मूलभूत सोईसुविधांचा विकास या योजनेंतर्गत मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील, महाजनवाडी, मीरा रोड येथे उभारण्यात आलेल्या मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक सुपरस्पेशालिटी (कॅशलेस काऊंटर) रुग्णालय तसेच मीरा-भाईंदर महानगरपालिकेने दिव्यांगांच्या उपचाराकरता उभारलेल्या फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्राचे ई-अनावरण व लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले तसेच जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीतून मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी खरेदी केलेली वाहने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालयाला सुपूर्द करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी कोनशिलेचे अनावरण आणि रुग्णालयाची पाहणी केली यावेळी लोकार्पण सोहळयाप्रसंगी आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, आमदार पराग शहा, माजी आमदार रवींद्र फाटक, आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर (भा.प्र.से.), पोलीस आयुक्त मधुकर पांडेय, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त संजय शिंदे, उपायुक्त रवी पवार, उपायुक्त कल्पिता पिंपळे, शहर अभियंता दिपक खांबित या मान्यवरांसह विभागप्रमुख, माजी नगरसेवक, नगरसेविका, महापालिका अधिकारी-कर्मचार्‍यांची तसेच स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आज लोकार्पण केलेल्या या रुग्णालयाची मी पाहणी केली. हे रुग्णालय पंचतारांकित दर्जाचे आहे. या माध्यमातून लोकांना उत्तम आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे, याचे समाधान वाटते. ते म्हणाले की, नवनवीन विकास कामे सुरू आहेत, आधी बंद असलेली विकास कामे पुन्हा वेगाने सुरू केली आहेत. दहिसर ते डहाणू, विरार ते अलिबाग कॉरिडॉर मार्गाचे काम हाती घेतले आहे. अ‍ॅक्सेस् कंट्रोल, ग्रीन फील्ड पद्धतीने पनवेल-गोवा महामार्गासह इतरही महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होतील. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गरजू रुग्णांना कॅशलेस सेवेमुळे आवश्यक उपचार विनामूल्य मिळणार आहेत. शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दीड लाख रुपयांच्या मर्यादेत पाच लाख रुपयांपर्यंत वाढ केली. जवळपास साडेबारा कोटी जनतेला मोफत आरोग्य सुविधा देण्यात आली असून मागील दीड वर्षात 180 कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातर्फे देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

First Published on: February 15, 2024 10:34 PM
Exit mobile version