गरीब आदिवासी महिलांनी पेटवली चूल

गरीब आदिवासी महिलांनी पेटवली चूल

पंतप्रधान उज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत घराघरात आदिवासी गोर गरीबांना गॅस पुरविण्यात आले खरे, मात्र हा गॅस सिंलेडरच आता महागल्याने सरकारने पुरविलेल्या गॅस शेगड्या पेटणार कशा या चिंतेत असलेल्या आदिवासी महिलांनी पुन्हा आपला मोर्चा चुलीकडे वळवला आहे. दऱ्या खोऱ्यातील आदिवासी कुटुंबानी चूल पेटविण्यासाठी पारंपारिक सरपणालाच पसंती दिल्याचे दिसत आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वासिंद खर्डी, कसारा , डोळखांब , किन्हवली कर्ड दुर्गम भागातील दारिद्रय रेषेखालील पिवळ्या धारकांना अवघे शंभर रुपये भरुन लाभार्थी आदिवासींना उज्वला गॅस योजनेअंतर्गत शेगडी आणि सिलिंडरचे वाटप करण्यात आले आहे. यात वनविभागाकडून देखील गॅस सिलिंडर दिले गेले. अवघ्या शंभर रुपयात मिळालेला सिलिंडर संपल्यावर दुसरा सिलिंडर लाभर्थींना स्वतः विकत घ्यायचा आहे.
सिलिंडर घ्यायचा झाल्यास ८०० रुपयांचा गॅस घ्यायचा कसा, या चिंतेत अनेकांनी या पंतप्रधान उज्वला गॅस योजनेच्या शेगड्या बंद करुन स्वयंपाकासाठी यापुढे स्वस्तातल्या आपल्या पारंपारीक मातीच्या चुलीच बऱ्या असे म्हणत पुन्हा आदिवासी वाड्या वस्त्यांमध्ये चुली पेटवल्या आहेत. चुलीसाठी रानोरानी सरपण गोळा करण्यासाठी महिला जंगलात पायपीट करत आहेत. मोठा गाजावाजा करुन सरकारने सुरु केलेल्या पंतप्रधान उज्वला गॅस योजनेचा ग्रामीण भागात पुरता बोजवारा उडाला आहे.
सुरुवातीला ४०० रुपयांना मिळणा-या गॅसचे भाव गगनाला भिडत चालले आहेत. गॅस सिलिंडरच्या वाढत्या महागाईच्या भडक्यात ही योजना मोलमजुरी करणाऱ्या गरीबांना कशी काय परवडेल, दिवसभर शंभर ते दिडशे रुपयांच्या मजुरीसाठी वणवण करणाऱ्या गोर गरीब आदिवासींना हा सरकारी गॅस परवडणारा नसल्याने गॅसला नापसंती देत त्यांनी पुन्हा आपली चूल पेटवत सरपणाला पसंती दिली आहे.

First Published on: March 7, 2021 7:20 PM
Exit mobile version