रमजान ईदच्या सेवया झाल्या महाग

रमजान ईदच्या सेवया झाल्या महाग

मुस्लिम बहुल भिवंडीत रमजान ईद या सणाला लक्ष्य करीत सेवयांचे भाव दीडपट वाढवून या वर्षी महागाईचा उच्चांक गाठला आहे. शंभर रुपयांना मिळणारी सेवयी सध्या 250 रुपयांना विकत मिळत असल्याने मुस्लिम धर्मीय नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणी सेवयांची काळाबाजारी करणार्‍यांवर अंकुश लावण्यासाठी नागरिकांनी स्थानिक पोलीस उपायुक्त तसेच अन्न आणि औषधे प्रशासन यांच्याकडे निवेदने दिली आहेत.

महिनाभर पवित्र रमजानच्या उपवासानंतर मुस्लिम धर्मीय या पर्वाची सांगता ईदच्या सणाने गोडधोड करून करीत असतात. त्या निमित्ताने घरोघरी दूध आणि सेवयांची खीर अथवा शीरखुर्मा बनविण्यात येतो. त्यामुळे मार्केटमध्ये सेवयांचा मोठा बाजार लागतो. दरवर्षीप्रमाणे उत्तरप्रदेश मधील विविध ठिकाणच्या उत्पादकांकडून सेवयांचा माल येथे विक्रीसाठी मागविला आहे. येथील व्यापार्‍यांनी साठा केला आहे. आणि मनमानीपणे त्याची जास्त दारात विक्री केली जात आहे, असा आरोप करीत पीपल्स रिपब्लिकन पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष अब्दुल गनी खान यांनी स्थानिक पोलीस उपयुक्त नवनाथ ढवळे आणि ठाण्यातील अन्न व औषधे प्रशासन विभागाला लेखी निवेदन देऊन काळाबाजार करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुंबई,मालेगाव आणि इतर शहरात याच सेवया मागील वर्षीच्या विक्री दराप्रमाणे विकल्या जात आहे. असे असताना भिवंडीत जास्त दर का आकाराला जात आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

First Published on: April 11, 2023 10:32 PM
Exit mobile version