ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडून स्मार्ट सिटी प्रकल्पाचा आढावा

ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडून स्मार्ट सिटी प्रकल्पाचा आढावा

ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट, गावदेवी पार्किंग, इंटिग्रेटेड कमांड अँन्ड कंट्रोल सेंटर, स्मार्ट मीटर योजना तसेच इतर सर्व प्रकल्पाचा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार गुरुवारी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी आढावा घेवून सर्व कामांची गती वाढविण्याचे कडक निर्देश संबंधितांना दिले.

महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी स्मार्टसिटीच्या सर्व प्रकल्पांचा विभागप्रमुखांसमवेत आढावा घेतला. यावेळी मुख्य तांत्रिक अधिकारी प्रवीण पापळकर, उप नगर अभियंता (प्र)अभियंता शुभांगी केसवासी, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, नोडल अधिकारी विकास ढोले तसेच इतर संबंधित अधिकारी आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या ठाणे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरु असलेल्या कोलशेत वॉटर फ्रंट, साकेत-बाळकुम वॉटरफ्रंट, रेतीबंदर पारसिक, नागला बंदर तसेच कोपरी वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट कामाच्या प्रगतीचा महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी आढावा घेतला. नागला बंदर परिसरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून इतर उद्यान विषयक इतर कामे तसेच बांधकामविषयक सर्व कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. तसेच रेतीबंदर पारसिक प्रकल्पाबाबतच्या तांत्रिक बाबीदूर करण्यासाठी संबधितांसमवेत बैठक आयोजित करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

यासोबतच शहरात स्मार्ट सिटीच्यावतीने राबविण्यात येणारे सॅटीस (ठाणे पूर्व), एकात्मिक पाणीपुरवठा करण्यासाठी स्मार्ट मीटर योजना, डिजिटल प्रणाली, इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर, गावदेवी पार्किंग आदी प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. संबंधित प्रकल्पाबाबतच्या तांत्रिकबाबी तसेच प्राथमिक अडचणींवर सविस्तर चर्चा करून सर्व कामे वेळेतच पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधिताना दिले.

First Published on: July 14, 2022 8:18 PM
Exit mobile version