आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांचा शोध सुरु

आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांचा शोध सुरु

उल्हासनगर । शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करणार्‍या भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच महेश गायकवाड यांच्या समर्थकांवर पोलीस ठाण्याच्या परिसरात जमाव एकत्र करून मारामारी, तणाव निर्माण करणे आदी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील द्वारली गावातील जमिनीच्या वादावरून भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचे फुटेज समोर आले.

गणपत गायकवाड यांनी हा प्रकार केल्याचे सीसी टीव्हीतून उघड झाले. त्यांनी हल्ला करण्यापूर्वी पोलीस ठाण्यात त्यांच्या दोनशे पेक्षा जास्त समर्थकांना जमा करून पोलिसांवर दबाव बनवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या सर्व समर्थकांकडे हत्यारे होती. अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली. महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्याच्या बाहेर हल्ला केला असता तर दोन्ही बाजूने गोळीबार झाला असता. त्यात अनेक जण मृत्यूमुखी पडले असते, म्हणून त्यांनी पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनची निवड केल्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान जगताप केबिनच्या बाहेर कार्यकर्त्यांचा सुरु असलेल्या गोंधळ शांत करण्यासाठी गेले असता त्याचा फायदा उचलत गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर ताबडतोब गोळ्या झाडल्या.

गोळ्यांच्या आवाज ऐकून काही क्षणात केबिनमध्ये येऊन पोलीस निरीक्षक जगताप यांनी गायकवाड यांच्या हातातील रिव्हॉल्व्हर हिसकावण्याचा प्रयत्न केला. तो पर्यंत गायकवाड यांच्या बंदूकीतून चार गोळया महेशला लागल्या होत्या. तर दुसर्‍या बाजूने हर्षल केणे याने महेशवर दोन गोळ्या झाडल्या. परंतु जगताप यांनी मोठ्या शिताफीने दोघांच्या बंदुका ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. यात पोलीस निरीक्षक जगताप यांचा जीव थोडक्यात बचावला. झालेल्या प्रकाराने हिल लाईन पोलीस कमालीचे हादरले असून आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबारामुळे पोलिसांची प्रतिमा मलीन झाली असून राजकीय पुढर्‍यांचा पोलिसांवर वाढता दबाव आणि हस्तक्षेपामुळे पोलीस विभाग कमालीचा अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे. झुंड शाही मोडण्यासाठी पोलिसांनी गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्या समर्थकांचा शोध घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्या साठी पोलीस ठाण्याचे सीसीटीव्ही, पोलीस ठाण्याच्या परिसरातील रस्ते, इमारतीतील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरु केले आहे. या शिवाय खबर्‍यांना देखील कामाला लावण्यात आले आहे. या शिवाय ज्यांच्याकडे रिव्हॉल्वर बंदुकीचे लायसेन्स आहे. त्यांची माहिती घेण्यात येत आहे. दुसरीकडे ज्याप्रमाणे अंबरनाथमध्ये गोळीबार प्रकरणी पंढरीनाथ फडकेंसमवेत 36जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्याच प्रमाणे आता ठाणे पोलीस आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचे साथीदारांवर मोक्का कायद्यांंर्गत कारवाई करणार असल्याचे समजते आहे.

First Published on: February 4, 2024 10:43 PM
Exit mobile version