ज्येष्ठ शिवसैनिक अनंत ( बाबू ) मालुसरे यांचे निधन

ज्येष्ठ शिवसैनिक अनंत ( बाबू ) मालुसरे यांचे निधन
दिवंगत शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या खांद्याला खांदा लावून ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे काम करणारे ज्येष्ठ शिवसैनिक अनंत गेणू मालुसरे यांचे वयाच्या ७१ वर्षी अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले. ते चांगले स्पोर्ट्समन होते. तसेच वृक्षप्रेमी होते. त्यांच्या पश्चात पत्नी मीना, मुलगा सुयोग, प्रीतम, मुलगी सोनाली, सुना-जावई, नातवंडे असा परिवार आहे. शनिवारी ठाण्यातील जवाहरबाग स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी, आमदार निरंजन डावखरे अन्य राजकीय मंडळींसह नातेवाईक परिवार उपस्थित होते.
मूळ रायगड जिल्ह्याचे सुपुत्र असलेले दिवंगत अनंत मालुसरे यांचे मोठे बंधू बाळकृष्ण मालुसरे हे ठाण्यातील शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनेचे काम करत होते. त्यातून अनंत मालुसरे यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. दिघे यांच्यासह माजी आमदार मो दा जोशी यांच्यासोबत त्यांनी काम करत शिवसेना वाढवली. यावेळी त्यांनी कोणत्या पदाची अपेक्षा केली नाही. शेवटपर्यंत ते शिवसैनिक म्हणूनच काम करत राहीले. शिवसेनेच्या आंदोलनात किंवा इतर काम करताना ते नेहमी आग्रही असायचे. याचदरम्यान त्यांची नाळ खेळाशी जोडली होती. ते उत्कृष्ट कबड्डीपटू होतेच त्याचबरोबर ते वेटलिफ्टर होते. त्यांनी राज्यस्तरावर सुवर्णपदकही पटकावले. याशिवाय उमा नीलकंठ व्यायामशाळेतून त्यांना शरीर शौष्ठ स्पर्धेत बॉडी बिल्डर पहिला ‘किताब मिळाला होता.
तसेच त्यांनी ठाणे असो या कल्याण डोंबिवली, नवी मुंबई या महापालिकांसह अंबरनाथ, बदलापूर या सारख्या नगरपालिकांमध्ये लाखो झाडांचे मोफत वाटप केले. तसेच ठाणे शहरात झाडे लावा आणि झाडे जगवा हा संदेश देण्यात त्याचा मोलाचा सहभाग राहिला. याचदरम्यान त्यांचे महाराष्ट्र शासनच्या वनश्री पुरस्कारासाठी नॉमिनेशन झाले होते आणि ठाणे महापालिका तर्फे वृक्षमित्र म्हणून त्यांना गौरवण्यात आले. १९९० साली महाड येथील थिळे गावात स्वःताच्या श्रमदानातून गावात ५ किलोमीटर रास्ता बांधला होता त्यावेळी रायगड जिल्ह्यातून त्यांचे कौतुक करण्यात आले होते ठाणे पालिकेकडून वृक्ष मित्र असल्याने त्यांना ठाणे गौरव पुरस्कार देण्यात आला होता. २००२ साली त्यांच्या पत्नी मीना अनंत मालुसरे यांना शिवसेनेकडून नगरसेविका होण्याचा मान मिळाला. तसेच त्यांचे चिरंजीव सुयोग हे आपला व्यवसायाबरोबरच समाजसेवेत वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचे समाजकार्य पुढे नेण्याचे कार्य यशस्वीपणे करत आहे.
First Published on: May 7, 2023 10:26 PM
Exit mobile version