शहापूरची भेंडी सातासमुद्रापार

शहापूरची भेंडी सातासमुद्रापार

शहापूर । शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पिकवलेली ताजी हिरवीगार भेंडी शेतकर्‍यांसाठी वरदान ठरली आहे. या चवदार भेंडीला परदेशातही मोठी मागणी होत असून युरोप, ब्रिटन तसेच आखाती देशवासियांच्या ताटात शहापूरची भेंडी आहे. शहापूरच्या बाजारपेठेत रोज एक ते दोन हजार क्विंटल भेंडीची आवक होत असून किलोमागे 30 रुपयांच्या आसपास भाव मिळत आहे. ही भेंडी खरेदी करण्यासाठी सध्या बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून येत आहे. शहापूर तालुक्यातील शेतकरी भातसा नदी व काळू नदी लहान मोठे ओहोळ, पाझर तलाव तसेच बंधारे येथील पाण्याचा वापर करून उन्हाळी मोसमात भाजीपाल्याची लागवड करतात. येथील माती तसेच वातावरण भेंडी पिकासाठी उपयुक्त असल्याने स्थानिक शेतकर्‍यांनी या उत्पादनाला जास्त प्राधान्य दिले आहे.

वासिंदजवळील दहागाव, सारमाळ, बावघर, मासवणे, सापगाव, शेई, मढ, नडगाव, बेडीसगाव, मुगाव, परटोली, कानवे, किन्हवली व डोळखांब परिसरातील छोट्या गाव खेड्यांमध्ये भाजीपाल्याच्या लागवडीबरोबरच भेंडी तसेच काकडी व कारली अशी पिकेही घेतली जात आहेत.शहापूर तालुक्यात या वर्षी भेंडीचे सर्वाधिक विक्रमी उत्पन्न झाले आहे. त्यामुळे कृषी उत्पन बाजार समितीमध्ये आवक वाढली असून वाशी, दादर येथील मोठे व्यापारी खरेदीसाठी येथे येतात.जागेवरच शेतकन्यांना किलोमागे 35 ते 40 रुपयांचा दर मिळत असल्याने रोकडे पैसे त्यांच्या खिशात खुळखुळत आहेत. या भागातील भेंडीचे व्यवस्थित पॅकिंग करून त्याचा दर्जा चांगला ठेवण्यावर भर दिला जात आहे. ही भेंडी मोठ्या व्यापार्‍यांमार्फत थेट परदेशात पोहोचवली जाते.

सहाशे हेक्टरमध्ये लागवड
या वर्षी शहापूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी 600 हेक्टरमध्ये भेंडीची लागवड केली आहे. दरवर्षी साधारण दोन ते तीन लाख रुपयांची कमाई शेतकर्‍यांना भाजीपाला लागवडीतून होत असून या पिकाला बाजारपेठेत चांगला भाव मिळत असल्याचे शेंद्रुण येथील शेतकरी भालचंद्र पाटोळे, सिताराम गोडे व अर्जुन गोडे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

First Published on: March 11, 2024 10:26 PM
Exit mobile version