ओबीसींच्या मागण्यांसाठी शहापूर तालुका बंद

ओबीसींच्या मागण्यांसाठी शहापूर तालुका बंद

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देऊ नये, मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करू नये, तसेच मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष थांबवणे या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय ओबीसी महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष भरत निचिते यांनी त्यांच्या वालशेत या गावात सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ शहापुर तालुक्यात बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता पुकारण्यात आलेला बंद शांततेत पार पडला.

मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष थांबवण्याबरोबरच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देऊ नये तसेच मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करू नये या प्रमुख मागण्यांसह बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ओबीसींसह सर्वांची जनगणना करणे, महाराष्ट्र सरकारने ओबीसींच्या नोकर्‍यांची श्वेतपत्रिका काढून ओबीसींचा नोकर्‍यांमधील अनुशेष त्वरित भरणे आदी मागण्यांसाठी अखिल भारतीय ओबीसी महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष भरत निचिते यांनी तालुक्यातील त्यांच्या वालशेत या गावात रविवार पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाच्या समर्थनार्थ गुरुवारी तालुक्यातील शहापूर, वासिंद, डोळखांब, खर्डी, किन्हवली, कसारा येथील अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठ, रिक्षा बंद ठेवण्यात आल्या. यावेळी शहापुर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंद शांततेत पार पडला असून कोठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे शहापूर पोलिसांनी सांगितले.

First Published on: November 30, 2023 10:46 PM
Exit mobile version