शहापूर तालुक्याला ‘ट्रामा केअर सेंटर’ची गरज

शहापूर तालुक्याला ‘ट्रामा केअर सेंटर’ची गरज

शहापूर । मुंबई-नाशिक महामार्ग, मुंबई-कसारा मध्य रेल्वे मार्ग, समृद्धी महामार्ग, शहापूर-मुरबाड-नगर अशा मार्गाचे जाळे शहापूर तालुक्यात असून येथील महामार्गावर वारंवार भीषण अपघात नेहमी घडत असतात. वेळीच उपचार न मिळाल्याने अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. परंतु शहापुर तालुक्यात अपघातग्रस्तांवरील तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी ट्रॉमा केअर सेंटर उपलब्ध व्हावे, यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची गरज आहे.
समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानंतर जखमींना तात्काळ उपचारांसाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयाचा आधार घ्यावा लागला. परंतु अपघातात २० च्या आसपास मजुरांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी तेथे उपचारास मर्यादा असल्याने गंभीर जखमींना ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर मृतदेह ठेवण्यासाठी कक्ष नसल्याने मृतदेह उघड्यावर ठेवण्यात आले होते. त्यामुळे तालुक्यात एखादा मोठा अपघात झाल्यास अत्याधुनिक उपचारांसाठी सुविधा नसल्याने अपघात ग्रस्तांना ठाणे, कल्याण आणि मुंबई यासारख्या शहरातील रुग्णालयात न्यावे लागते.

मुंबई-नाशिक महामार्गावर सातत्याने अपघात होतात. तसेच मुंबई – नाशिक रेल्वे मार्गावरही अशा दुर्घटना घडतात. जखमींना प्रथम शहापूर उपजिल्हा रुग्णालय आणि तेथून ठाणे-मुंबईतील रुग्णालयांत दाखल करावे लागते. हे टाळण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटना आणि स्थानिक लोकप्रतिनिधी मार्फत सातत्याने शहापूर तालुक्यात ट्रॉमा केअर सेंटरची मागणी होत आहे. पण लोकप्रतिनिधी पाठपुरावा करीत नसल्याने ट्रामा केअर सेंटर रखडले आहे. खर्डी येथे खर्डी ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम सुरू झाले असून या नव्या इमारतीत जागा उपलब्ध असून येथील पहिल्या मजल्यावर ट्रामा केअर सेंटर तात्काळ सुरू करण्यात यायला काहीही अडचण नसून हे रुग्णालय खर्डी रेल्वे स्थानक मुंबई-आग्रा महामार्गालगत खर्डी नाक्यावर मध्यवर्ती ठिकाणी असल्याने येथे जखमी ना तात्काळ उपचार मिळून अनेक अपघातग्रस्तांचे जीव वाचू शकतात. तर या रुग्णालयालगत ५ एकर जागाही ट्रामा केअर सेंटरसाठी मंजूर असून येथे बांधकाम होईपर्यंत खर्डीच्या ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर सुरू करून अपघातग्रस्तांना दिलासा देण्याची गरज आहे.

रेल्वे तसेच महामार्गावरील अपघातातील अनेक जखमींना तात्काळ अत्याधुनिक उपचार न मिळाल्याने स्थानिक रुग्णालयामधून कल्याण-ठाण्यात नेताना प्रवासामध्ये अनेक मृत्यू होतात. आमच्यासाठी हा नेहमीचा अनुभव आहे. त्यासाठी तालुक्यातील जनता आणि अपघातग्रस्तासाठी खर्डी येथे ट्रामा केअर सेंटर सुरू करून जखमींचे जीव वाचवावेत.
– नरेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते

खर्डी येथे ट्रामा केअर सेंटर व्हावे यासाठी, मंत्रालय स्तरावर प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे.
– डॉ.कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे

First Published on: April 24, 2024 9:44 PM
Exit mobile version