सरपंच निवडणुकीत सेना – भाजपची प्रत्येकी दहा ग्रामपंचायतींवर सत्ता

सरपंच निवडणुकीत सेना – भाजपची प्रत्येकी दहा ग्रामपंचायतींवर सत्ता

भिवंडी तालुक्यात १५ जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीत भाजपा शिवसेना या दोन्हीकडून वर्चस्वाचा दावा केला जात असताना सोमवारी २८ ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडीच्या विशेष सभा पार पडल्या. यामध्ये भाजपा व शिवसेना या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी १० ग्रामपंचायतींवर सत्ता स्थापन करण्यात यश मिळविले आहे. तर राष्ट्रवादी-काँग्रेस व काँग्रेस पक्षासह आरपीआय सेक्युलर, श्रमजीवी संघटना यांनी प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर झेंडा फडकविला आहे. तसेच चार ग्रामपंचायतींवर स्थानिक ग्रामविकास समितीने सत्ता प्रस्थापित केली आहे.

भिवंडी तालुक्यातील चुरशीच्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सर्वांचे लक्ष सरपंच निवडीच्या सभेकरता लागलेले असते. सोमवारी झालेल्या २८ ग्रामपंचायत सरपंच निवडीच्या प्रक्रियेत भाजपाने वळ, पुर्णा, काल्हेर, नांदकर, भिनार, कुकसे, दिवे अंजुर, निवळी अशा नऊ ग्रामपंचायत, तर लाखीवली, शेलार या ठिकाणी उपसरपंच पदावर भाजपाने बाजी मारली असून शिवसेनेने बारा ग्रामपंचायतीवर भगवा फडकवला आहे. यामध्ये दापोडे, गुंदवली, कांदळी,सोनाळे, पिसे चिराड पाडा, वडवलीतर्फे राहुर, लामज, चावे, खांबाळ, खांडपे या ग्रामपंचायतींवर झेंडा फडकविला आहे. श्रमजीवी संघटनेने लाखीवली, आरपीआय सेक्युलरने शेलार ग्रामपंचायत सरपंच पदावर बाजी मारली आहे.

दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सरवली तर महेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खारबाव ग्रामपंचायतीवर झेंडा फडकविला आहे. तर शेलार या ग्रामपंचायत या अनुसूचित जातीसाठी राखीव ग्रामपंचायतीवर आरपीआय सेक्युलरचे अ‍ॅड. किरण चन्ने हे सरपंच तर बहुमतात असलेल्या भाजपाच्या ज्योत्सा दशरथ भोईर या विजयी झाल्या आहेत. कांदळी या ग्रामपंचायतीवर शिवसेना ग्रामीण विधानसभा संपर्क संघटक विष्णू चंदे यांचा वरचष्मा राहिला असून बिनविरोध निवडणुकीत त्यांनी नम्रता ज्ञानेश्वर जाधव व नितीन विष्णू गोष्टे या दोघांची सरपंच उपसरपंच पदावर वर्णी लागली. पिसे चिरडपाडा या ग्रामपंचायतीवर शिवसेना उपतालुका प्रमुख विजय पाटील यांनी वर्चस्व प्रस्थापित करत पत्नी रिंकल विजय पाटील यांना सरपंचपदी विराजमान केले आहे.

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या सरवली ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे वर्चस्व राखण्यात दयानंद चोरघे यांना यश आले आहे. तर संध्या नितेश चौधरी व करण किशोर मार्के या दोघा युवा सदस्यांनी भाजप-शिवसेना पुरस्कृत उमेदवारांचा पराभव करुन विजय मिळवला. तसेच राष्ट्रवादी-काँग्रेसने वर्चस्व मिळविलेल्या खारबाव ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी महेंद्र पाटील व उपसरपंचपदी रेश्मा संदीप पाटील निवडून आले आहेत. सुरई सारंग, आलिमघर या ठिकाणी ग्रामविकास समिती पुरस्कृत सत्ता स्थापन झाली आहे.

हेही वाचा –

संसद भवन उभारण्यापेक्षा प्रत्येक जिल्ह्यात सुसज्ज रुग्णालय उभारा – डॉ अमोल कोल्हे

First Published on: February 9, 2021 3:32 PM
Exit mobile version