शिवसेनेच्यावतीने ठाण्यातून दुर्घटनाग्रस्त भागाला मदत

शिवसेनेच्यावतीने ठाण्यातून दुर्घटनाग्रस्त भागाला मदत

शिवसेनेच्यावतीने ठाण्यातून दुर्घटनाग्रस्त भागाला मदत

सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळून  अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनाग्रस्त भागातील लोकांचे संसार देखील यात वाहून गेले आहेत. त्यामुळे ठाण्यातून शिवसेनेच्यावतीने दुर्घटनाग्रस्त भागाकडे अन्नधान्य आणि इतर आवश्यक वतूच्या रूपाने  मोठ्या प्रमाणात मदत पाठवण्याचे काम सुरू आहे.

सध्या महाराष्ट्रात पावसाने रौद्र रूप धारण केले असून अनेक ठिकाणी दरड कोसळून घरे उद्ध्वस्त झाली आहेत तर नदीकिनारी असणाऱ्या गावात देखील पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्यांची घरे पाण्यात बुडाली आहेत. दुर्घटना ग्रस्त भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यासाठी मदत म्हणून ठाणे जिल्हा शिवसेनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात मदत ही कोकणातील महाड,खेड,चीपळून या ठिकाणी पाठविण्यात आली आहे. सांगली कोल्हापूर सातारा या ठिकाणी देखील मदत पाठवण्याचे काम सुरू आहे. दुर्घटना घडल्यानंतर राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के देखील दुर्घटना स्थळी दाखल झाले आहेत. शिवसेनेच्यावतीने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची टीम देखील कालच दुर्घटनाग्रस्त भागात रवाना झाली आहे. या पावसाचा सर्वात जास्त फटका कोकणाला बसला आहे. त्यामुळे कोकणात  तांदूळ,गहू,डाळ,साखर, तेल, पीठ यासारख्या खाद्यपदार्थांचे २५ हजार किट तसेच २५ हजार ब्लॅंकेट, टॉवेल, इत्यादी वस्तू कोकणाकडे रवाना करण्यात आल्या आहेत. दुर्घटनाग्रस्त भागातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे त्या भागात मोठ्या प्रमाणात मेणबत्त्या देखील पाठवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत कोकणात सहा हजार कीट रवाना झाले असून येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पूर्णपणे मदत ही कोकणाला दिली जाईल. तसेच कोल्हापूर सांगली सातारा या भागात देखील लवकरात लवकर मदत पोहोचवली जाईल असे माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांनी सांगितले. त्यामुळे दुर्दैवाने दुर्घटना भागातील जनजीवन पुन्हा कधी सुरळीत होईल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

“घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून ठाण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आम्ही लवकरात लवकर मदत पोहोचवण्याचे प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मदत खेड,महाड,चीपळून या भागाकडे रवाना झाली आहे. यामध्ये २५ हजार अन्नधान्याचे किट ब्लँकेट व जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. सांगली,सातारा, कोल्हापूर या भागाकडे देखील मदत पाठवण्याचे काम सुरू आहे. दररोज सहा हजार किट पाठवण्याचा आमचा उद्देश असून येत्या चार दिवसात पूर्णपणे मदत दुर्घटनाग्रस्त भागात पोहोचवली जाईल.”

–  राम रेपाळे, माजी स्थायी समिती सभापती


हेही वाचा – अतिवृष्टीचा ८९० गावांना तडाखा ७६ जणांचा मृत्यू, ५६ व्यक्ती बेपत्ता

First Published on: July 24, 2021 8:42 PM
Exit mobile version