कल्याण सिटी पार्कची दुरवस्था

कल्याण सिटी पार्कची दुरवस्था

कल्याण । मोठा गाजावाजा करीत कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथील सिटी पार्कचे लोकार्पण होऊन महिनाही उलटला नसताना सिटी पार्कमध्ये काही उपद्रवींकडून नासधूस करण्यास सुरुवात झाली आहे. पार्कमधील झाडांना पाणी देण्यासाठी बसवलेली सिंचन पाइप यंत्रणा उपद्रवींनी उखडून टाकली आहे. तसेच उद्यानातील पथवेच्या साईड लाईटची देखील तोडमोड झाली असल्याने सिटी पार्क सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न देखील आता ऐरणीवर आला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातून कल्याण पश्चिमेकडे सिटी पार्क सुरू करण्यात आले. आधुनिक पद्धतीची विद्युत रोषणाई आणि वेगवेगळ्या आकारातील झाडांची मांडणी, सायकल ट्रॅक, चालण्यासाठी मार्गिका याची पद्धतशीर मांडणी या उद्यानात करण्यात आल्याने नागरिकांची पहिल्या दिवसांपासून या उद्यानाला पसंती मिळाली.

सुट्टीच्या दिवशी हजारो नागरिक या उद्यानात फिरण्यासाठी येत असल्याने मोठी गर्दी होते. लोकार्पणानंतर पालिका प्रशासनाने नागरिकांकरिता सिटी पार्क कुठलेही शुल्क न करता खुले केले होते. मात्र काही अवधीनंतर पालिकेने शुल्क आकारण्याचे धोरण राबविण्यात सुरुवात केली होती. मागील रविवारी तर जवळपास 700 ते 800 नागरिक तासभर तिकिटाच्या रांगेत होते. तरीही त्यांना तिकीट मिळाले नाही, म्हणून लोकप्रतिनिधींना हस्तक्षेप करावा लागला आणि या नागरिकांना विनातिकीट उद्यानात प्रवेश देण्यात आला. झुंडीने नागरिक उद्यानात शिरल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. सिटी पार्कला असा नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असताना, काही उपद्रवींकडून उद्यानाची नासधूस करण्यात येत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. उद्यानातील सिंचनाचे पाइप उखडून तोडून टाकल्याचे फोटोही नागरिकांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या उपद्रवींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनानेही या नुकसानीबद्दल खंत व्यक्त केली असून नागरिकांनी हे उद्यान आपले आहे, असे समजून त्याचे जतन करावे, असे आवाहन केले आहे. सध्या ज्या ठेकेदाराने सिटी पार्कचे काम केले त्यांच्या दोन तीन सुरक्षा रक्षकांवर सिटी पार्कची सुरक्षतेची मदार आहे.

First Published on: March 10, 2024 9:59 PM
Exit mobile version