अंबरनाथमधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला वेग

अंबरनाथमधील वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला वेग

गेली अनेक दिवसांपासून अंबरनाथ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे काम धिम्या गतीने सुरू होते, त्याची वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तानी गंभीर दखल घेतली होती. त्यानंतर या विषयी कडक शब्दात निर्देश दिल्याने महाविद्यालयाच्या कामाने वेग पकडला आहे. त्यामुळे महविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाणार आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवटकर हे महाविद्यालायाच्या पाहाणीसाठी अंबरनाथमध्ये आले होते. यावेळी त्यांनी वसतीगृहाची आणि रुग्णालयातील आवश्यक सुविधांची पाहाणी केली. यावेळी त्यांनी आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती, डागडुजी करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले. राज्यात एकूण नऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत. यासाठी सरकारने चारशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या नऊपैकी एक ठाणे जिल्हातील अंबरनाथ शहरात उभारले जाणार आहे. त्यासाठी सरकारी पातळीवर कामे सुरू आहेत. या महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी एक कोटींचे अर्थसहाय्य आणि राज्य सरकारकडून वीस एकर जागा हस्तांतरित करण्यात आली आहे.

या बाबत वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवटकर यांनी वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाच्या कामकाजाची पाहाणी करताना संबंधित अधिकार्‍यांना कामे वेगाने करण्याचे निर्देश दिले. या रुग्णालयासाठी स्थानिकआमदार डॉ बालाजी किणीकर आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. सरकारकडून विविध मंजुरी मिळवण्यासाठी किणीकर यांनी विशेष पाठपुरावा केल्याने या महाविद्यालयाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. मधल्या काळात हे काम संथ झाल्याने आमदार किणीकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त निवटकर यांनी गंभीर दखल घेत या महाविद्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला आहे. अंबरनाथ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑगस्ट 2024 ला विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रीया सुरू होणार आहे. त्यापूर्वी येथील व्यवस्था दुरुस्त करून आवश्यक त्या कामासाठी इमारत सज्ज करण्याच्या सूचना आहेत.

First Published on: October 31, 2023 8:38 PM
Exit mobile version