मांडा पश्चिम भागात कोविड लसीकरण केंद्र सुरु करा; मनसेची मागणी

मांडा पश्चिम भागात कोविड लसीकरण केंद्र सुरु करा; मनसेची मागणी

कल्याण डोंबिवली प्रमाणेच टिटवाळ्यामध्ये कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेऊन महापालिका प्रभाग क्रमांक आठ मांडा पश्चिम परिसरात कोवीड लसीकरण केंद्र लवकरात लवकर सुरू करावे , अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे . ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे . तर महापालिका क्षेत्रात देखील कोवीड पेशंटच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे . कोवीड रोखण्यासाठी शासनाने लस उपलब्ध करून दिली आहे . महापालिका क्षेत्रात लसीकरण केंद्र सुरु केली आहेत . मांडा टिटवाळा परिसरात कोरोना पेशंटची संख्या झपाट्याने वाढत आहे . त्यामुळे या परिसरात कोवीड लसीकरण केंद्र असणे गरजेचे आहे.

याकरता मनसेचे प्रभाग क्रमांक आठ शाखा अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर यांनी जानकी विद्यालयाचे मुख्याध्यापक यांची भेट घेतली व निवेदन देत याठिकाणी लसीकरण केंद्रासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली. या मागणीबाबत मुख्याध्यापक यांनी तत्काळ शाळेमध्ये जागा उपलब्ध करून दिली असून तसे पत्र देखील शाळेने दिले आहे. त्यानंतर भोईर यांनी महापालिका आयुक्तांना देखील निवेदन देऊन मांडा पश्चिम मध्ये लसीकरण केंद्र सुरु करावे अशी मागणी केली आहे . मांडा टिटवाळा परिसरात कोवीड आजारात वाढ दिसून येत असून ही वाढ रोखण्यासाठी लसीकरण केंद्र सुरु करणे आवश्यक आहे. जानकी विद्यालयाची जागा लसीकरणासाठी उपलब्ध करून दिली असून लसीकरणासाठी लागणाऱ्या साधन सामग्रीसाठी देखील सहकार्य केले जाईल, असे ज्ञानेश्वर भोईर यांनी सांगितले.

First Published on: April 30, 2021 1:56 PM
Exit mobile version