अंधेरीतून चोरीला गेलेली दुचाकी कल्याणात सापडली

अंधेरीतून चोरीला गेलेली दुचाकी कल्याणात सापडली

कल्याण । कल्याणात वाहतूक शाखेच्या कारवाईत नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी टोइंग व्हॅनच्या मदतीने उचलून नेण्यात आल्या. मात्र दिवसभर मालक न आल्याने आणि दुचाकीचे हँडल लॉक तुटलेले असल्याने वाहतूक शाखेच्या पोलिसानी संशय आल्याने या दुचाकी मालकाचा शोध सुरू करत मूळ मालकांना या दुचाकी देण्यात आल्या आहेत. मागील दोन दिवसात वाहतूक पोलिसांनी अशा प्रकारे तीन मोटर सायकल चोरीचा छडा लावल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

शहाड रेल्वे स्थानक परिसरात नो पार्किंगमध्ये उभी असलेली दुचाकी टोइंग व्हॅनने उचलून नेली. मात्र दिवसभरात ती नेण्यासाठी कोणीही न आल्याने वाहतूक पोलिसांनी नंबर प्लेट वरुन मालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता नंबर जुळत नसल्याने त्यांना संशय आला. गाडीच्या चेसिस नंबरवरून आरटीओच्या मदतीने या गाडी मालकाचा शोध घेतला असता अंधेरी येथील आशीष कातारकर या तरुणाची ही दुचाकी चार महिन्यापूर्वी चोरीला गेली होती. याप्रकरणी त्यांनी पोलिसात तक्रार केली होती. गाडीचे हप्ते सुरू होते. मात्र दुचाकी सापडत नसल्याने हा तरुण त्रस्त होता. पोलिसांचा फोन जाताच तातडीने या तरुणाने कल्याण वाहतूक शाखेत धाव घेत आपली चोरीला गेलेली दुचाकी ताब्यात घेतली. तर बुधवारी संध्याकाळी शहाड परिसरात पुनः एकदा हँडल लॉक तुटलेली गाडी दिसल्याने या गाडीची चौकशी करता ही देखील चोरीची असल्याचे स्पष्ट झाले. भिवंडी मधील दुचाकी मालकाला वाहतूक पोलिसांनी ही दुचाकी ताब्यात दिली. तर गुरुवारी देखील कल्याण पश्चिमेकडील परिसरात आणखी एक गाडी सापडली असून आरटीओच्या मदतीने या मालकाला संपर्क केला जात आहे. ही गाडी देखील अशीच चोरट्यानी नो पार्किंग क्षेत्रात सोडून दिल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. टोईंगमुळे दुचाकीचे नुकसान होत नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर टोइंगमुळे चोरीला गेलेल्या तीन गाड्यांचा शोध लागल्याने टोइंग कर्मचार्‍यांचे कौतूक होत आहे.

First Published on: March 22, 2024 9:53 PM
Exit mobile version