केडीएमसीच्या उपायुक्तांवर कारवाई करा

केडीएमसीच्या उपायुक्तांवर कारवाई करा

केडीएमसी

कल्याण । पथविक्रेत्यांना पूर्व सूचना न देता मारहाण करणे, दहशत निर्माण करून मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोप करून पालिका अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचे निलंबन करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश पथारी सुरक्षा दल आक्रमक झाला आहे. गुरुवारी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर या फेरिवाल्यांनी धरणे आंदोलनाला सुरवात केली आहे. तसेच प्रत्येक पथविक्रेता धारकांना परवाने द्यावे ही मागणी देखील केली असून येत्या चार ते पाच दिवसात या मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर फेरीवाल्यांचा मोर्चा धडकणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य पथारी सुरक्षा दलाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आबासाहेब शिंदे यांनी दिला आहे.

यावेळी आबासाहेब शिंदे यांच्यासह रायगड प्रमुख लहू गायकवाड, पुणे शहर अध्यक्ष गणेश लांडगे, ठाणे जिल्हाध्यक्ष सदाशिव टाकळकर, महिला जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा टाकळकर, कल्याण तालुका अध्यक्ष तानाजी सावंत, कल्याण शहर अध्यक्ष महेश भोईर, डोंबिवली प्रमुख बबन कांबळे, अभय दुबे, दिपक भालेराव, अमोल केंद्रे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. संबंधित अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधितांवर निलंबनाची कारवाई करून कायदेशीर पथविक्रेत्यांना म.न.पा. परवाने देण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती आबासाहेब शिंदे यांनी दिली.

First Published on: April 25, 2024 9:50 PM
Exit mobile version