उल्हासनगरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत; अनेकांना घेतला चावा

उल्हासनगरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत; अनेकांना घेतला चावा

उल्हासनगरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत; अनेकांना घेतला चावा

गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगरमधील कॅम्प नंबर ४, सुभाष टेकडी परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला असून, त्याने अनेक लहान मुलांसोबत वयोवृद्ध नागरिकांवर हल्ला करून चावा घेतल्याने नागरिक हैराण झाले असून अनेक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते अडव्होकेट प्रशांत चंदनशिव यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पालिका आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांना ईमेलद्वारे तक्रार करून बंद करण्यात आलेल्या भटक्या कुत्र्यांना पकडणारे पथक पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. पॅनल क्रमांक १८ सुभाष टेकडीतील दहा चाळ, भीमशक्ती मित्र मंडळ, डिफेन्स कॉलनी, रामजी आंबेडकर नगर या परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा वावर असून त्याने ७ ते ८ लहान मुलांसोबतच वयोवृद्धांवर हल्ला करून त्यांच्या पायांचा चावा घेतला आहे. याशिवाय पाळीव कुत्र्यावर देखील त्याने हल्ला केला आहे.

कुठेतरी दबा धरून बसल्यावर हा पिसाळलेला कुत्रा दुकानात लहानसहान वस्तू घेण्यासाठी जाणाऱ्या बच्चेकंपनी, वयोवृद्धांवर झडप घालून आणि त्यांचा चावा घेऊन पळून जात आहे. त्यामुळे त्याला तात्काळ पकडून लहान मुले आणि नागरिकांची भीतीमधून सुटका करावी, अशी विनंती प्रशांत चंदनशिव यांनी केली आहे. यासंदर्भात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पगारे यांच्याशी विचारणा केली असून भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी दोनदा निविदा प्रक्रिया हाताळण्यात आली आहे. त्यास प्रतिसाद मिळत नाही. त्यासाठी एनजीओची मदत घेण्यात येत असल्याचे सांगितले.

First Published on: April 16, 2021 7:47 PM
Exit mobile version