गटबाजीमुळे ठाणे जिल्ह्यात भाजप पक्षाला खिंडार पडले

गटबाजीमुळे ठाणे जिल्ह्यात भाजप पक्षाला खिंडार पडले

ठाणे जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी मधील गटबाजी उफाळून आली असून त्याचा परिपाक म्हणून भाजपा प्रदेश सचिव तथा माजी जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यावर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दयानंद चोरघे यांच्यावर भाजपा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली होती. दरम्यान त्यांची चार महिन्यापूर्वी प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली. परंतु जिल्ह्यातील खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांनी त्यांना निर्णय प्रक्रियेपासून बाजूला सारून काम सुरू केल्याने दयानंद चोरघे आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याने त्यांनी भाजपा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठविला. यामुळे राज्याच्या सत्तेत नसलेल्या भाजप पक्षामधून आता फुटाफुटीचे राजकारण होत असल्याचे समोर आले आहे.

आपण वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे चोरघे यांनी नमूद केले. तरी सुध्दा खासदार कपिल पाटील यांच्या कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. येत्या काही दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य त्या पक्षात प्रवेश करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे दयानंद चोरघे यांनी सुतोवाच केले आहे. दयानंद चोरघे यांच्या राजीनाम्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा भाजपा मधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

चोरघे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाचा विस्तार करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. अनेक गावांमध्ये भाजपच्या शाखा उघडल्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही पक्षाला मतदान मिळवण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला. मात्र खासदार, आमदार आपल्याला बाजूला सारून अन्याय करत असल्याची एक भावना चोरघे आणि त्यांच्या वर्तुळात तयार झाली. त्यामुळे अगतिकतेमधूनच त्यांनी निर्णय घेतला असावा, असे बोलले जात आहे.

भाजपमधूनही आऊटगोईंग सुरु?

२०१४ साली सत्तेत आल्यानंतर भाजपमध्ये अनेक पक्षांमधून इनकमिंग सुरु झाले होते. शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचे अनेक नेते भाजपवासी झाले. या इनकमिंगला मेगाभरती असे नाव दिले गेले होते. मात्र आता सत्ता महाविकास आघाडीकडे जाताच, राज्यातील भाजप नेत्यांमध्ये चलबिचल सुरु आहे. त्यातूनच आता पुन्हा भाजपमधून आऊटगोईंग सुरु होईल की काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे.

First Published on: November 8, 2020 7:07 PM
Exit mobile version