पोलीस आयुक्त फणसाळकर यांचा ‘ठाणे पॅटर्न’ लवकरच महाराष्ट्रात

पोलीस आयुक्त फणसाळकर यांचा ‘ठाणे पॅटर्न’ लवकरच महाराष्ट्रात

पोलीस आयुक्त फणसाळकर यांचा ‘ठाणे पॅटर्न’ लवकरच महाराष्ट्रात

जनतेचे कोरोनापासून संरक्षण व्हावे म्हणून स्वतःच्या जिवाची बाजी लावून जनतेचा जीव वाचवणार्‍या आणि त्यामध्ये कोरोनाची लागण होऊन दुर्दैवाने बळी गेलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या मुलांना पोलीस सेवेत थेट नियुक्ती पत्र देण्याचा अभिनव आणि आदर्श उपक्रम ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी नुकताच ठाण्यात केला. राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्या हस्ते ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ७५ जणांना अशाप्रकारे थेट पोलीस सेवेत दाखल करून घेण्यात आले. पोलीस महासंचालकांनीही आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या या आदर्श उपक्रमाची दखल घेत संपूर्ण राज्यात हा ठाणे पॅटर्न राबवण्याची घोषणा करून फणसाळकर यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे ठाणे जिल्ह्यासह राज्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करणारे, त्यांच्या दुःखावर फुंकर घालणारे एक संवेदनाक्षम ज्येष्ठ पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात. ठाणे पोलीस आयुक्तालयात कोरोना काळात सेवा बजावताना प्राण गमावलेल्या 75 पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मुलांना फणसाळकर यांनी पोलीस सेवेत थेट नियुक्ती पत्र देऊन दाखल करून घेतले. राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यामुळे कर्ता पुरुष गमावलेल्या पोलीस कुटुंबियांच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव होते.

दुःखाचा भार हलका करण्याचा प्रयत्न

कोरोना काळामध्ये पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी जीवाची बाजी लावून सेवा केली. यामध्ये दुर्दैवाने काही पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण होऊन त्यामध्ये दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यांच्या दुःखाचा भार काहीसा हलका करण्यासाठी या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मुलांना पोलीस सेवेत थेट दाखल करून घेण्याचा प्रस्ताव मी मांडला. त्याला तातडीने राज्याच्या पोलीस महासंचालकांनी तसेच गृह मंत्रालयाने तातडीने मान्यता दिली.
विवेक फणसाळकर, पोलीस आयुक्त, ठाणे.

 

कोरोनाशी लढताना संपूर्ण राज्यभरात अनेक पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचे दुर्दैवाने निधन झाले आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाने अशा अधिकारी व कर्मचार्‍यांच्या मुलांना थेट पोलीस सेवेत दाखल करून घेतले आहे. हा ठाणे पॅटर्न राज्यभरातील अन्य पोलीस आयुक्तालय तसेच ग्रामीण पोलीस मुख्यालयात आम्ही राबवणार आहोत.
-हेमंत नगराळे, पोलीस महासंचालक

 

First Published on: January 31, 2021 10:38 PM
Exit mobile version