इमारतीचे भगदाड दुरुस्त मात्र धोका कायम

इमारतीचे भगदाड दुरुस्त मात्र धोका कायम

केडीएमसीच्या अधिकार्‍यांच्या सही शिक्क्यासह बनावट बांधकाम परवानगी तयार करुन बेकायदा इमारतीसाठी रेरा प्रमाणपत्र मिळविल्या प्रकरणी 65 बिल्डरांवर गुन्हा दाखल झाला. मात्र ती बेकायदा बांधकामे देखील जमीनदोस्त करण्याचे धाडस केडीएमसी प्रशासनाने दाखविले नाही. त्यामुळे आजही शेकडो बेकायदा बांधकामे सुरूच आहेत. केडीएमसी प्रशासना कडून बेकायदा बांधकाम करणार्‍या भूमाफिया आणि बिल्डरांवर केवळ कागदोपत्री कारवाई केली जाते. प्रत्यक्षात त्या बेकायदा इमारत जमीनदोस्त न करता केवळ स्लॅब बुजवण्याची, पाडण्याची कारवाई केली जात आहे. बेकायदा बांधकाम करणारे स्मार्ट बिल्डर्स स्लॅबला पाडलेली भगदाडे पुन्हा बुजवून इमारती पूर्ववत करीत आहेत. त्यामुळे भविष्यात अशा धोकादायक इमारतीत राहणार्‍यांचे जीव धोक्यात येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

बनावट बांधकाम परवानगीच्या आधारे बेकायदा बांधकाम करणार्‍या 65 बिल्डरांवर गुन्हा दाखल करून केडीएमसी प्रशासनाने कायदेशीर कारवाई केली. मात्र सरकारची, केडीएमसीची व ग्राहकांची फसवणूक होवू नये व बेकायदा बांधकामे करणार्‍यांना जरब बसावी,म्हणून केडीएमसी प्रशासनाने ती 65 बांधकामे जमीनदोस्त करायला हवी होती. मात्र केडीएमसी प्रशासनाने ते धाडस दाखविले नाही. एकही बांधकाम जमीनदोस्त न केल्याने अनेक इमारतींमध्ये आता रहिवास सुरु झाला आहे. त्यामुळे त्या इमारतींना पाणी पुरवठा कोणी दिला? चोरीचे पाणी कनेक्शन दिले असेल तर पालिका प्रशासनाने त्या इमारतींचे बेकायदा पाणी पुरवठा कनेक्शन खंडित का केले नाही? असा प्रश्न निर्माण होतो. डोंबिवली शहरात पश्चिमेत जुनी डोंबिवली,कोपर,ठाकूरवाडी,मोठागाव,रेती बंदर रोड,महाराष्ट्र नगर,गरीबाचा वाडा, देवीचा पाडा,नवापाडा,कुंभारखाण पाडा आदी परिसरात तर पूर्वेला आयरे,दत्त नगर,गोग्रासवाडी आणि खंबाळपाडा आदी ठिकाणी शेकडोंच्या संख्येने बेकायदा इमारती उभारण्याची कामे बिनादिक्तपणे सुरूच आहे.

महापालिकेच्या आरक्षित जागेवर अनधिकृत बांधकामे होत असताना देखील कोणतीही कारवाई होत नाही . डोंबिवली पूर्वेला मानपाडा रोडवर गावदेवी मंदिर शेजारी उद्यानाच्या राखीव जागेवर ,पश्चिमेला महात्मा गांधी मार्गावर उद्यानासाठी राखीव असलेल्या जागेवर, खंबाळपाडा कांचन गाव येथील आरक्षित जागेवर व दफनभूमीच्या आरक्षित जागेवर 7 मजल्यांच्या बेकायदा इमारती बांधल्या जात आहेत. काही बिल्डर्स बेकायदा आणि कमकुवत झालेली घरे ग्राहकांना घरे विकत आहेत.मात्र असे स्लॅब कधीही कोसळून दुर्घटना होवू शकते. त्यामुळे अशा घरात राहणे भविष्यात धोक्याचे ठरणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

या इमारतींचा वापर होवू नये म्हणून स्लॅबला भोकं पाडली गेली आहेत. मात्र ती भोकं पुन्हा बुजवून त्या इमारतींचा वापर केला जात असेल तर त्या इमारतींचा शोध घेवून पुन्हा त्यांना नोटीस देण्याची कारवाई कारवाई लागणार आहे.
-सुहास गुप्ते, सहाय्यक आयुक्त, एच वार्ड

 

First Published on: February 26, 2023 10:25 PM
Exit mobile version