ठाणे शहर आणि जिल्ह्यात गुढीपाडव्याचा उत्साह शिगेला

ठाणे शहर आणि जिल्ह्यात गुढीपाडव्याचा उत्साह शिगेला

ठाणे । ठाणे शहरात गुढीपाडवा निमित्ताने नववर्ष स्वागत यात्रा निघाली. ठाण्यात श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास मंदिर संस्थेच्या वतीने नववर्ष स्वागत यात्रा ढोल ताशांचा गजरात निघाली. आकर्षक चित्ररथ, पारंपारिक नृत्य, सामाजिक संदेश देणारे चित्ररथ यात्रांमध्ये पाहायला मिळाले. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, अभिनेत्री उपस्थित होते. पारंपारिक वेशभूषेमध्ये महिला, तरुण-तरुणी एकत्र जमून यात्रेची क्षणचित्रे, छबी मोबाईलमध्ये टिपत होते. वाहन विक्री दुकाने, सराफाच्या दुकानांमध्येही गर्दी पाहायला मिळाली. ठाण्यात श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास मंदिर संस्थेतर्फे स्वागत यात्रेची मोठ्या उत्साहात तयारी करण्यात आली. सकाळी 7 वाजता यात्रेची कौपिनेश्वर मंदिरातून सुरुवात झाली. स्वागत यात्रेचे अध्यक्ष म्हणून जेनरिक फार्मा व्यवसायचे अर्जुन देशपांडे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात्रेच्या सुरुवातीपासून सहभागी झाले होते. यंदाच्या यात्रेत यंदाच्या कौपीनेश्वर नववर्ष स्वागत यात्रेत एकूण 60 संस्थांनी सहभाग दर्शवला. या चित्ररथांमध्ये जिम्नॅस्टिक्स, मल्लखांबचे विविध प्रात्यक्षिके, शिवरायांचे मावळे या विषयांतर्गत मल्लखांब प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी सादर केले. शिवराज्यभिषेक सोहळा या विषयांवर वेगवेगळ्या संकल्पने अंतर्गत विविध चित्ररथ होते.

मतदानासंबंधी जनजागृती, मतदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन असे वैशिष्ठ्यपूर्ण विषयांचे चित्ररथ होते. संस्कार विषयक चित्ररथ, गर्भसंस्कार विषयक चित्ररथ, मनश्कती, संगीतपोचार, आहारविषयक प्रबोधन, धर्मजागृती, देहदान, पर्यावरणशी निगगडीत अनेक चित्ररथांचा सहभाग होता. हिंदु नववर्ष निमित्त शहरातील विविध भागात महारांगोळी रेखाटण्यात आल्या होत्या. संस्कार भारती ठाणे शाखेतर्फे गावदेवी मैदानात रांगोळीच्या माध्यमातून श्रीराम मंदिर मुक्ती आंदोलनाची कलात्मक मांडणी केली आहे. राम मंदिर निर्मिती कार्यातील चार महत्त्वाच्या घटनांचे रेखाटन या रांगोळी मध्ये साकारण्यात आले आहे. शीलान्यास रथयात्रा 1990 ची ‘कर सेवा’ आणि 1992 ची ‘कर सेवा’ यांचा समावेश आहे. तसेच संस्कार भारतीच्या कळवा समितीतर्फे कळवा येथील गावदेवी मैदानात चैत्रांगण महारांगोळी रेखाटण्यात आली आहे. यामध्ये हिंदु धर्मातील विविध चिन्हांचा समावेश आहे. नौपाडा येथे स्वागत यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यासाठी मंच उभारण्यात आले होते. अवघ्या काही फुटांवर हे विविध मंच होते. यात्रेत सहभागी होणार्‍यांवर त्यांच्याकडून पुष्पवृष्टी केली जात होती. ठाण्यात दरवर्षी मोठ्याप्रमाणात नागरिक यात्रेत सहभागी होत असतात. परंतु यावर्षी नागरिकांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचे दिसून आल्याचे चित्र होते.

सोने खरेदीसाठी उत्साह
सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाली असतानाही सोने खरेदीसाठी सराफांच्या दुकानात सोने खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. तर, दुचाकी आणि कार खरेदीसाठीही वाहन विक्री दुकानात ग्राहकांचा उत्साह दिसून आला.

शाळेला संविधान उद्देशिका शिलालेख प्रदान
शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद अस्नोली शाळेला गुढी पाडव्याचे औचित्य साधत विकास प्रतिष्ठानकडून भारताच्या संविधान उद्देशिकेचा शिलालेख भेट देण्यात आले. भारतीय संविधानाची विद्यार्थ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. भारतीय घटनेतील न्याय,स्वातंत्र्य,समानता आणि बंधुता ही मूळ तत्वे समाज मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे. भारतीय संविधानातील मूलतत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्य विद्यार्थ्यांना संस्कारित करणारी असून विद्यार्थ्यांच्या मनात याची रुजवणूक झाल्यास जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक घडविण्यास मदत होईल याच उद्देशाने शाळेला उद्देशिका शिलालेख प्रदान करण्यात येत असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी दिनकर यांनी बोलतांना सांगितले.
गावातील सुशिक्षत तरुणांनी स्थापन केलेल्या विकास प्रतिष्ठानातर्फे हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. गेल्या दहा वर्षापासून अनेक सामाजिक उपक्रम प्रतिष्ठानकडून राबवले जातात. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी दिनकर,सचिव कैलास दिनकर, कार्याध्यक्ष जयवंत दिनकर, सरपंच विष्णू देसले, शिक्षण समिती अध्यक्षा अनिता दिनकर, ग्रामपंचायत सदस्य अंकुश सातपुते, ज्ञानेश्वर दिनकर, रामदास सातपुते, भगवान दिनकर, कल्पेश दिनकर, उज्वला दिनकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन नवनीत फर्डे यांनी केले. प्रस्ताविक पदवीधर शिक्षक राजेंद्र सापळे यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक विजय पाटील यांनी केले.

शहापुरात भव्य स्वागतयात्रा
शहापुरात लक्ष्मी नारायण मंदिर ट्रस्ट नववर्ष स्वागतयात्रा समिती यांच्या माध्यमातून शहापूर शहरात भव्य स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शहापूरातील लक्ष्मी नारायण मंदिर पासून सुरवात करून भगवा चौक, मुख्य बाजारपेठ, मिरची गल्ली, कासरआळी, ब्राम्हण आळी असे मार्गक्रमण करत पुन्हा स्वागत यात्रा लक्ष्मी नारायण मंदिर येथे काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा करून सकाळी 7 वाजता गुढीचे पूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. महाआरतीने स्वागत यात्रेची सांगता करण्यात आली.

कल्याणच्या स्वागतयात्रेत हिंदुत्वाचा जयघोष
कल्याण । गुढीपाडव्यानिमित्त कल्याणात यंदा न भूतो अशी हिंदू नववर्ष स्वागतयात्रा निघालेली पाहायला मिळाली. यावेळी इंडीयन मेडीकल असोसिएशनकडे यंदाच्या रौप्य महोत्सवी नववर्ष स्वागतयात्रेचे यजमानपद आले होते. त्यांनी कल्याणातील मराठी बांधवांसह गुजराथी, जैन, पंजाबी, दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय समाजालाही या स्वागतयात्रेमध्ये सहभागी करून घेतल्याने त्याला सर्वसमावेशक असे स्वरूप प्राप्त झाले होते. तर यावेळी मुख्य स्वागतयात्रेसोबत आणखी दोन भव्य शोभायात्राही कल्याण पश्चिमेत निघाल्याने कल्याणच्या कानाकोपर्‍यात हिंदुत्वाचा जयघोष आणि कल्याणकरांचा जल्लोष दिसून आला. जागोजागी काढण्यात आलेल्या भव्य रांगोळ्या आणि विविध सामाजिक संस्थांकडून या स्वागत यात्रेचे पुष्पवृष्टीत स्वागत केले जात होते. कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोड परिसरातून कल्याणच्या या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागतयात्रेला उत्साहात प्रारंभ झाला.
कल्याण पश्चिमेत यंदा मुरबाड रोड येथील मुख्य स्वागत यात्रेसोबतच खडकपाडा साईचौक आणि उंबर्डे, आधारवाडी येथूनही दोन भव्य शोभायात्रा निघाल्या होत्या. शोभायात्रेत मोठ्या संख्येने आगरी कोळी समाजबांधव आपल्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.

नववर्ष स्वागत यात्रेवर षुष्पवृष्टी
ठाणे । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मंगळवारी, 9 एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त निघालेल्या नववर्ष स्वागत यात्रेवर षुष्पवृष्टी करत नौपाडा आणि कळवा नाका येथे भव्य स्वागत केले. गुढी पाडव्यानिमित्त ठाणे शहारातील कोपिनेश्वर मंदिर येथून दरवर्षी नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात येते. मंगळवारी, 9 एप्रिल रोजी, सकाळी 7 वाजता नववर्ष स्वागत यात्रेची सुरुवात झाली. सालाबाद प्रमाणे याहीवर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (पश्चिम) येथे तसेच कळवा येथील कळवा नाका येथे नववर्ष स्वागत यात्रेवर षुष्पवृष्टी करत स्वागत केले. यावेळी स्वागत यात्रेमध्ये सहभागी नागरिकांना मोफत शीतपेये वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नववर्ष स्वागत यात्रेसाठी ‘स्वागत व्यासपीठ’ बनविण्यात आले होते. या स्वागत व्यासपीठावर महाराष्ट्र वैभव गौरवार्थ चित्र प्रदर्शन भरवण्यात आले.

कल्याणाच सप्तस्वरांनी नव्या वर्षाचे स्वागत
कल्याण । कल्याणातील रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या पूर्वसंध्येला आयोजित सप्तसुरांच्या जल्लोषात कल्याणकर रसिक न्हाऊन निघाले. एकीकडे सुप्रसिद्ध गायक नचिकेत लेले, नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील, मिमिक्री आर्टिस्ट डॉ. संकेत भोसले आणि अभिनेत्री आदिती सारंगधर या कलाकारांनी एकाहून एक सरस अदाकारीने उपस्थितांची मने जिंकली. इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याण आणि कल्याण संस्कृती मंचच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान यावेळी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्ताने नयनरम्य अशा फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी उपस्थितांना मतदानाची शपथ दिली.

First Published on: April 9, 2024 10:19 PM
Exit mobile version