ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा जोर ओसरतोय

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा जोर ओसरतोय

गेल्या काही महिन्यांपासून ठाणे जिल्ह्यात वाढणार्‍या कोरोनाच्या संसर्गाला पुन्हा एकदा ब्रेक लागल्यास सुरुवात झाली आहे. कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने सक्रिय रुग्णांची संख्याही कमी होऊ लागली आहे. आरोग्य विभागाने वर्तविलेला अंदाज या घटत्या रुग्ण संख्येवरून खरे ठरताना दिसून लागले आहे. यापुर्वी शंभरहून अधिक आढळून येत होते. ते आता संपुर्ण जिल्ह्यात दररोज 15 ते 30 च्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. ठाणे जिल्ह्यात मार्च महिना सुरु होताच कोरोनाचा संसर्ग अचानकपणे वाढू लागला. ठाणे जिल्ह्यात दररोज शंभरहून अधिक रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या ही 720च्या घरात पोहोचली होती. त्यापैकी 266 इतके रुग्ण ठाणे शहरातील होते. यामुळे ठाणे शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून येत असल्याचे चित्र होते. त्याचपाठोपाठ नवीमुंबईत रुग्ण वाढत होते. ती संख्या 220 झाली होती. तर आता ठाणे शहरात सक्रीय रुग्ण संख्या 111 तर नवी मुंबईतील सक्रीय रुग्ण संख्या 96 इतकी आहे. मात्र ठाणे शहरात रुग्ण मृत्युचे प्रमाणही याचदरम्यान वाढले होते. शहरात आतापर्यंत सात जणांचा करोनामुळे मृत्यु झाला आहे. या वाढत्या संसर्गामुळे संपुर्ण जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली होती.

हा संसर्ग वेळीच रोखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना हालचाली सुरू केल्या होत्या. यामध्ये तपासणी सह कोरोना चाचण्याही वाढण्यावर विशेष करून भर दिला गेला होता. ठाणे शहरात दररोज 2500 च्या आसपास कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. याचदरम्यान ठाण्यात उभ्या राहणार्‍या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या भूमिपूजन सोहळ्यात राज्याचे आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी 15 मे पर्यंत कोरोनाचा संसर्ग कमी होईल अशी शक्यता वर्तविली होती. तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र खबरदारी घेण्याचे आवाहन केले होते. ते भाकीत आता खरे ठरताना दिसत आहे.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कमी होऊ लागली आहे. संपुर्ण जिल्ह्यात दररोज 15 ते 30 च्या आसपास रुग्ण आढळून येत आहे. त्यातच कोरोना मुक्त होणार्‍यांची संख्या वाढू लागली आहे. एप्रिल महिन्यात जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 720 इतकी होती. ती संख्या आता तीनशेवर आली आहे. ती पण, अजून त्याचा प्रादुर्भाव असल्याने नागरिकांनी त्रिसूत्री नियमावलीचे पालन करावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.

First Published on: May 8, 2023 9:38 PM
Exit mobile version