गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांचा लाँग मार्च मंत्रालयावर धडकणार

गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांचा लाँग मार्च मंत्रालयावर धडकणार

शहापूर तालुक्यातील शासकीय विश्राम गृह येथून 7 फेब्रुवारी रोजी गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांचा लॉन्ग मार्च आपल्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयाच्या दिशेने रवाना झाला असून 9 फेब्रुवारीला हा लॉन्ग मार्च मंत्रालयावर धडकणार आहे. गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका 18 ऑक्टोबर 2023 पासून बेमुदत संपावर गेल्या आहेत. त्याबाबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांनी 1 नोव्हेंबर रोजी कृती समितीच्या पदाधिकार्‍यांना गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांच्या शिष्टमंडळाला बोलाविले होते. त्यांच्या सोबत झालेल्या चर्चेमध्ये गटप्रवर्तकांना 10 हजार मानधन आशा स्वयंसेविकांना 7 हजार मानधन तसेच दिवाळी भाऊबीज 2 हजार तसेच गटप्रवर्तकांना आरोग्य वर्धिनीचे 15 शे रुपये देण्याचे जाहीर केल्याने हा संप मागे घेण्यात आला होता.

त्याबाबत शासकीय आदेश निर्गमित करण्याचे मान्य केले होते. मात्र दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस उलटले तरी शासकीय आदेश पारित न केल्याने गटप्रवर्तक व आशा सेविकांच्या महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाने शहापूर ते मंत्रालय असा लॉन्ग मार्च काढला आहे. मानधनात वाढ, दिवाळी बोनस, या बाबत शासनाने त्वरित आदेश पारित करावेत. यासाठी अनेक आंदोलने केली तरी आदेश पारित न केल्याने आशा स्वयंसेविकांच्या कृती समितीने पुन्हा 12 जानेवारी 2024 पासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. कॅबिनेटच्या बैठकीत मानधनात वाढ व दिवाळी भाऊबीजेच्या संबंधित निर्णय घेतला नसल्याने गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांच्या कृती समितीने 7 फेब्रुवारी रोजी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातून शहापूर ते मंत्रालय धडक लॉन्ग मार्च काढला आहे. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष एम.ए. पाटील, सरचिटणीस भगवान दवणे, अपर्णा पानसरे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, हे या लॉन्ग मार्चचे नेतृत्व करत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अपर्णाताई खाडे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष देवेंद्र भेरे या लॉन्ग मार्च प्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी शहापूरच्या तहसीलदार कोमल ठाकूर, उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे, पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी चोख बंदोबस्त राखून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली.

First Published on: February 8, 2024 10:14 PM
Exit mobile version