भूखंड हडपण्याचा डाव पोलिसांनी उधळला

भूखंड हडपण्याचा डाव पोलिसांनी उधळला

कुणी राहत नसल्याची संधी साधून उल्हासनगरातील पोलीस वसाहतीचा राखीव भूखंड हडपण्याचा डाव हिललाईन पोलिसांनी उधळून लावला आहे. याप्रकरणी पिता-पुत्राला अटक करण्यात आली आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारिपूत्र यांनी दिली.

कॅम्प नंबर 5 मधील भूखंडावर पोलीस वसाहत आहे. पूर्वी तिथे पोलीस त्यांच्या कुटुंबासोबत राहत होते. मात्र एखाद दिड वर्षांपासून वसाहतीत पोलीस राहत नाहीत. शनिवारी अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या प्रवेश करून पोलीस वसाहतीच्या रिक्त जागेची मोजणी करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक मदन सोलसे यांनी टीम सोबत घटनास्थळी पाठवले असता सतपालसिंग चावला, भवज्योतसिंग चावला हे पिता-पुत्र पोलीस वसाहतीची रिक्त जागा मोजत असल्याचे मिळून आले. त्यांना अटक करण्यात आली आहे. या पिता-पुत्राला न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) पोपट करडकर करत असल्याचे लक्ष्मण सारिपूत्र यांनी सांगितले.

हिललाईनच्या हद्दीत पोलीस वसाहतीसाठी 5 ते 6 राखीव भूखंड असून कुणी त्यावर अतिक्रमण करू नये किंवा हडपू नये यासाठी त्यावर फलक लावण्यात येणार आहे, असे लक्ष्मण सारिपूत्र यांनी स्पष्ट केले.
दरम्यान यापूर्वीही सतपालसिंग यांना उपविभागीय कार्यालयाकडून विठ्ठलवाडी पोलिसांच्या राखीव भूखंडावर सनद मिळाल्याने त्यांनी बांधकाम सुरू करण्याचा प्रयत्न केला होता.त्यावेळी हा प्रकार शिवसेना आणि सहायक पोलीस आयुक्त,वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी उपविभागीय अधिकारी जगतसिंह गिरासे यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर गिरासे यांनी ही सनद रद्द केली होती.

First Published on: January 10, 2022 5:29 PM
Exit mobile version