ऐरोली मतदारसंघातील रखडलेले प्रकल्प नवीन वर्षात मार्गस्थ

ऐरोली मतदारसंघातील रखडलेले प्रकल्प नवीन वर्षात मार्गस्थ

ऐरोली विधानसभा मतदारसंघातील रखडलेले महत्वपूर्ण विकास प्रकल्प नव्या वर्षात मार्गी लागणार आहेत. मतदार संघातील महत्त्वपूर्ण दिघा रेल्वे स्टेशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या डोमचे काम, मुंबईला जोडण्यासाठी ऐरोलीतून जाणाऱ्या रस्त्यावरील टी जंक्शनचे काम आणि ऐरोली पटणी रस्त्याच्या कामाचे सुशोभीकरण नव्या वर्षामध्ये पूर्ण होणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

वाशी – ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे व ऐरोली रेल्वेस्थानकादरम्‍यान दिघा रेल्वे स्थानकाचे काम एमआरव्हीसीच्या (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) माध्यामातून करण्यात येत आहे. रेलकॉन इन्फ्रास्ट्रक्‍चर या ठेकेदारांकडून ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झालेले काम मार्च २०२० पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र कामातील अडथळे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरांची कमतरतेमुळे विलंब झालेले काम नूतन वर्षात पूर्ण होणार असल्याचा विश्वास एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

दिघा रेल्वे स्थानकांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई येथील कार्यक्रमातून रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून डिसेंबर २०१६ मध्ये करण्यात आले. मात्र तांत्रिक कारणामुळे, तब्बल १४ महिन्यांनी म्हणजे ७ मे २०१८ रोजी प्रकल्पाला प्रत्यक्ष मुहूर्त मिळाला. शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते दिघा रेल्वे स्थानकाच्या प्रस्तावित जागेच्या ठिकाणी भूमिपूजनही करण्यात आल्यानंतर दिघा रेल्वे स्थानकाचा फलक उभारण्यात आला. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही.दिघा रेल्वे स्थानकांच्या आराखड्यात बदल करण्यात आल्‍याने निविदा प्रक्रियेला उशीर झाला. त्‍यामुळे ऑक्टोबर २०१८ मध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. १११ कोटी रुपये खर्च करून उभ्या करण्यात येणा-या  दिघा रेल्वे स्थानकांचे काम नवीन वर्षात पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. दिघा रेल्वे स्थानक साकारल्यानंतर ऐरोली नॉलेज पार्कमधील आयटी पार्क, विटावा, गणपती पाडा, आनंद नगर, दिघा, विष्णुनगर येथील रहिवाशांना याचा लाभ होणार आहे. तर ऐरोली, ठाणे व कळवा रेल्वे स्थानकांवरील गर्दी देखील कमी होईल.

ऐरोलीत उभारलेल्‍या नवी मुंबईकरांसाठी भूषणावह आणि आयकॉनिक अशा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामधील अंतर्गत असणाऱ्या लायब्ररी, सभागृह आदी सुविधा नागरिकांसाठी महापरिनिर्वारण दिनी खुल्या करण्यात आल्या आहेत. स्मारकाच्या डोमवर मार्बलचे आच्छादन करण्यात येत असून काम प्रगतिपथावर आहे. दहा वर्षांपासून स्मारकाचे काम सुरू होते. हे काम पूर्ण होण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सातत्याने बैठका घेत प्रत्यक्ष कामाची अनेकदा पाहणी केली. आंबेडकर स्मारकातील ग्रंथालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत लिहिलेली विविध ग्रंथसंपदा ठेवण्यात आली आहे. त्‍याचबरोबरच ई-बुक व ऑडिओ-बुक सुविधाही उपलब्ध आहे. बाबासाहेबांचा जीवनपट छायाचित्रांच्या माध्यमातून दाखविण्यात आला असून स्‍मारक उभारण्यासाठी तब्‍बल ५३ कोटी ५६ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावर घणसोली कार्यक्षेत्रातील रबाळे येथे ऐरोली टी-जंक्‍शनला जाण्यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून भुयारी मार्ग बांधण्यात आला आहे. हे काम पूर्ण झाले असून उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. भुयारी मार्ग खुला झाल्‍यास रबाळे टी-जंक्शनजवळील वाहतूक कोंडी फुटणार असून त्‍यासाठी सुमारे ११ कोटी १९ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. रबाळे येथील भीमनगर तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांना ऐरोली टी जंक्शनकडे जाण्यासाठी रबाळे सर्कल येथून यू-टर्न घेत रबाले सिग्नलजवळ वाहतूक कोंडीतून द्राविडी प्राणायाम करत जावे लागते. भुयारी मार्गाचे नवीन वर्षाच्या प्रारंभीच लोकार्पणाची शक्‍यता आहे.

First Published on: January 2, 2022 5:05 PM
Exit mobile version