कल्याणमधील पोलिसांच्या प्रशासकीय कार्यालयांचा विषय अधिवेशनात

कल्याणमधील पोलिसांच्या प्रशासकीय कार्यालयांचा विषय अधिवेशनात

कल्याण मधील पोलिसांच्या प्रशासकीय कार्यालयांचा विषय अधिवेशनात मांडण्यात आला असून स्टेशन नजीक एकाच इमारतीत कार्यालये उभारण्याची मागणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे. तर एनआरसी कामगारांच्या थकीत देण्यांकडे देखील आमदारांनी लक्ष वेधले असून केडीएमसी क्षेत्रातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी केडीएमसीला निर्देश देण्याची मागणी त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलतांना केली आहे. कल्याण स्टेशन परिसरात कोर्टाच्या समोर महात्मा फुले पोलीस ठाण्याची जुनी इमारत आहे. तर कोर्टाच्या दुसऱ्या बाजूला कल्याण शहर एसीपी कार्यालयासह वाहतूक विभागाचे देखील कार्यालय आहे. ही दोन्ही कार्यालये आता साधारणपणे चाळीस ते पन्नास वर्षे जुनी झाली असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच याठिकाणी पोलीस विभागाची मोठी जागा असून या जागेवर एक प्रशस्त इमारत बांधून त्या एकाच इमारती स्थानिक पोलीस ठाणे, शहर वाहतूक शाखा, एसीपी ऑफिस आणि डीसीपी ऑफिस उभारण्याची मागणी आमदार भोईर यांनी यावेळी केली.

सध्याचे महात्मा फुले पोलीस ठाण्याची इमारत ही दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर स्टेशन परिसरात एकाच इमारतीत ही सर्व कार्यालये आल्यास सुरक्षेच्या आणि कामकाजाच्या दृष्टीने ते अधिक परिणामकारक ठरेल असेही आमदार भोईर यांनी सभागृहात मांडले. आमदार विश्वनाथ भोईर यांनी एनआरसी कंपनीतील कामगारांच्या थकीत देण्यांचा प्रश्नही सभागृहात उपस्थित केला. या कंपनीतील हजारो कामगारांची आर्थिक परिस्थिती अतिशय खालावली असून शासनाने तातडीने याप्रकरणी हस्तक्षेप करून कामगारांना ही देणी मिळवून देण्याची आवश्यकताही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नागरिकांची भविष्यातील पाण्याची गरज पाहता आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वतंत्र धरणाची मागणी केली आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून धरण प्रत्यक्षात यायला आणखी काही कालावधी लागेल. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने केडीएमसी प्रशासनाला निर्देश देऊन सध्या मतदारसंघात निर्माण झालेली पाणीबाणी सोडवण्याची मागणीही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी केली.

दरम्यान आपल्या मतदार संघातील प्रश्न अधिवेशनात मांडण्यासाठी दिवसभर काहीही न खाता उपाशी राहून आपल्या वेळेची प्रतीक्षा आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली. रात्री साडे आठच्या दरम्यान आमदारांना अधिवेशनात बोलण्याची संधी मिळाली. मतदार संघातील विषय सभागृहात मांडतांना विहित वेळ संपल्याने पीठासीन अधिकारी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झीरवळ यांनी बेल वाजवली असता, आपल्या मतदार संघातील प्रश्न मांडण्यासाठी वेळेची प्रतीक्षा करत दिवसभर जेवलो नसल्याचा उल्लेख आमदारांनी करत वेळ वाढवून देण्याची मागणी केली. यावेळी पीठासीन अधिकाऱ्यांनी देखील लागलीच याला मंजुरी देत आमदारांना वेळ वाढवून देत आपले मागणीपर प्रश्न मांडण्याची संधी दिली.

First Published on: March 16, 2023 10:15 PM
Exit mobile version