आरोग्य अधिकार्‍याचे निलंबन ही स्टंटबाजी!

आरोग्य अधिकार्‍याचे निलंबन ही स्टंटबाजी!

ठाणे महापालिकेची आरोग्य व्यवस्था जर कोलमडली असेल आणि त्यामुळे कळवा रुग्णालयाच्या अधिकार्‍याचे निलंबन होत असेल तर या बेजबाबदारपणाला आणि नागरिकांना आरोग्य सुविधा न मिळण्याला 15 वर्षे महापालिका एकहाती ताब्यात असणारे मुख्यमंत्री शिंदे हे जबाबदार असल्याचा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी केला आहे. कळवा रुग्णालयाची आरोग्य व्यवस्था सुधारा अशी वारंवार मागणी आणि आंदोलने आम्ही करूनसुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांनी लक्ष दिले नाही. ठाण्यातील जनता त्यांच्या विरोधात चालली आहे, तेव्हा ते स्टंट करायला लागले आहेत. मागील पंधरा वर्षाहून अधिक काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाणे महानगरपालिका प्रशासनावर एक हाती पकड आहे.

कायम सत्तेत असतानाही ठाणे शहरातील आरोग्य व्यवस्था सुधारली जात नसेल आणि येथील रुग्णांना आजही मुंबई महापालिकेच्या केईएम, सायन, जे जे हॉस्पिटल व अन्य रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत असेल तर मागील 18 वर्षात मुख्यमंत्र्यांनी ठाणे महानगरपालिकेत नेमका काय कारभार केला? याचे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्यायला हवे. केवळ एका नवनियुक्ति दिलेल्या अधिकार्‍याला निलंबित करून स्टंटबाजी करून चालणार नाही. तेथे ठेकेदार कोणाचे आहेत ? कोणाच्या आशीर्वादाने त्यांना वर्षानुवर्ष निविदा सेटिंग करून तेथे ठेके दिले जातात मुख्यमंत्री स्वतः ठाण्यात आठ वर्ष पालकमंत्री राहिले आहेत. त्याआधी ते सलग 3 वर्षे महापालिका सभागृह नेते होते. आमदार-पालकमंत्री म्हणून त्यांनी कामकाज पाहिले, पाहत आहेत. स्वतःच्या ताब्यात ठाणे महानगरपालिका असताना या महानगरपालिकेची दुरावस्था का झाली ? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी ठाणेकरांना द्यायला हवे, असे घाडीगावकर म्हणाले.

कोण घाडीगांवकर? असा सवाल उपस्थित करत, त्यांच्या आरोपाला आम्ही उत्तरे देणे योग्य वाटत नाही. जे कामात हलगर्जीपणा करतील, त्यांच्यावर कारवाई यापुढेही होईलच.
– नरेश म्हस्के, प्रवक्ते, शिवसेना

First Published on: March 5, 2023 10:00 PM
Exit mobile version