पारदर्शकपणे लोकसभा निवडणूक पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणांनी दक्षतेने काम करावे

पारदर्शकपणे लोकसभा निवडणूक पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणांनी दक्षतेने काम करावे

ठाणे । ठाणे जिल्ह्यातील 23 भिवंडी, 24 कल्याण आणि 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. येत्या 26 एप्रिलपासून नामनिर्देशन पत्रे भरण्यास सुरूवात होणार असून भारत निवडणूक आयोगाकडून नियुक्त निरीक्षक हे ठाणे जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात येणार आहेत. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी आणि नोडल अधिकाऱ्यांनी दक्ष राहून सर्व पथकांना सतर्कपणे काम करण्याच्या सूचना द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिल्या आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शिनगारे यांनी जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात आचारसंहिता पथक, दक्षता पथक, व्हिडीओ चित्रिकरण पथक, व्हिडीओ पाहणारे पथक, भरारी पथक, स्थिर देखरेख पथक, तसेच आयकर विभाग, अबकारी कर विभाग, 24×7 कॉल सेंटर, माध्यम कक्ष यासह निवडणूक खर्च निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. खर्च सर्व पथकांनी यापुढील काळात अतिशय बारकाईन प्रत्येक प्रक्रियेवर लक्ष ठेवावे. तसेच खर्च निरीक्षकांनीही उमेदवार व राजकीय पक्षांच्या खर्चावर लक्ष ठेवावे. जिल्ह्यात कुठेही आचारसंहिता भंग होणार नाही, याची दक्षता संबंधित पथकाने घ्यावी. तसेच ज्या ठिकाणी आचारसंहिता भंगाची तक्रार येईल, तेथे तातडीने गुन्हे दाखल करावे. निवडणुकीच्या कालावधीत अवैध रक्कम पकडणे, तिचा पंचनामा करणे, दारू, अन्य अवैध पदार्थ ताब्यात घेऊन दंडात्मक तथा प्रसंगी फौजदारी कारवाई भरारी पथकामार्फत करण्यात यावे, अशा सूचनाही शिनगारे यांनी दिल्या.

सर्व मतदारसंघातील एक खिडकी कक्षातून राजकीय पक्ष व उमेदवारांना आवश्यक ते परवाने देताना दक्षता घ्यावी व परवानगी मागणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखली जाईल व कोणत्याही प्रकारे त्याचा भंग होणार नाही, यासाठी पोलीस विभागाने बंदोबस्त ठेवावा. जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे, निर्भिड वातावरणात पार पडले, यासाठी सर्वच यंत्रणांनी जबाबदारीने कामे करावीत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शिनगारे यांनी दिल्या.

 

First Published on: April 24, 2024 9:19 PM
Exit mobile version