डोंबिवलीत यंदाही नववर्ष स्वागत यात्रा होण्याची शक्यता नाही

डोंबिवलीत यंदाही नववर्ष स्वागत यात्रा होण्याची शक्यता नाही

सुशिक्षितांची ,सुसंस्कृतांची सांस्कृतिक नगरी अशी ओळख असलेल्या डोंबिवली शहराने १९९९ मध्ये हिंदू नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे गुढीपाडव्याला सर्वप्रथम नववर्षाची स्वागत यात्रा सुरु केली. गेल्या २४ वर्षात याचे अनुकरण राज्यातील, देशातीलच नव्हे तर विदेशातील अनेक शहरात होवून गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रा काढण्याची आता परंपराच झाली आहे. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२० मध्ये प्रथमच या यात्रेला खंड पडला होता. आता कोरोणाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कल्याण डोंबिवलीतील संपूर्ण निर्बंध उठलेलेले नसल्याने यंदाही डोंबिवलीत स्वागत यात्रा निघण्याची शक्यता नाही ? असेच चित्र आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्ष स्वागत यात्रा काढण्याची प्रथा डोंबिवलीच्या गणेश मंदिर संस्थानाने सुरु केली. स्वागत यात्रेच्या पूर्वसंध्येपासून स्वागत यात्रेच्या मार्गावर रांगोळ्या काढल्या जायच्या. ठिकठीकाणी गुढ्या उभारल्या जायच्या. डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदान येथून या स्वागत यात्रेला सुरुवात होत असे. या यात्रेत श्री गणरायांची पालखी, विविध धार्मिक, सामाजिक, सेवाभावी संस्था, ज्ञाती संस्था आदींचे समाजप्रबोधनपर चित्ररथ या यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरत असायचे. तसेच पारंपारिक वेश परिधान केलेले स्त्री ,पुरुष व ढोल – ताशांसह विविध प्रकारच्या वाद्यांच्या गजराने संपूर्ण डोंबिवली दुमदुमून जायची. स्वागत यात्रेचा समारोप डोंबिवली पूर्वेतील आप्पा दातार चौकात महागुढी उभारून केला जायचा. या यात्रेत अनेक सेलिब्रेटी देखील सहभागी होत असता. चौकाचौकात या यात्रेवर पुष्पवृष्टी होत असे. त्यामुळे डोंबिवलीची स्वागत यात्रा पहाण्यासाठी अनुभवण्यासाठी आजूबाजूच्या शहरातील नागरिक देखील मोठ्या प्रमाणावर येत असत.

त्यानंतरच्या काळात कल्याण, ठाणे, मुंबईतील गिरगाव, दादरसह राज्यातील अनेक शहरात स्वागत यात्रा सुरु झाल्या. अगदी देश विदेशात देखील नववर्ष स्वागत यात्रा निघू लागल्या. मार्च २०२० मध्ये संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घालण्यास सुरुवात केली. अखेर संपूर्ण देशासह संपूर्ण जग लॉक डाऊन झाले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे या नववर्ष स्वागत यात्रेला खंड पडला. आता कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी झाला आहे. रुग्ण संख्या नगण्य झाल्याने अनेक शहरातील निर्बंध उठविण्यात आले आहे. आता होळीचा सण अवघ्या दोन – तीन दिवसांवर आला आहे. साधारण एक महिनाभर आधीच नववर्ष स्वागत यात्रेची तयारी सुरु असते. मात्र कल्याण डोंबिवली शहराने अजूनही लसीकरणाचे उद्दिष्ट्य गाठले नसल्याने कल्याण डोंबिवलीतील निर्बंध पूर्णपणे उठवले गेले नाहीत. त्यामुळे डोंबिवलीत यंदा तरी नववर्ष स्वागत यात्रा निघणार कि नाही ? याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

कल्याण डोंबिवलीतील कोरोना निर्बंध अद्याप उठलेले नाहीत, त्यामुळे पोलीस परवानगी मिळणे कठीण बाब झाली आहे. त्यातच स्वागत यात्रेची तयारी करायला पुरेसा वेळही आता राहिलेला नाही, त्यामुळे स्वागत यात्रा न काढता गणेश मंदिरा जवळ कार्यक्रम करण्याचा विचार सुरु आहे.
-मंदार हळबे , गणेश मंदिर संस्थांचे पदाधिकारी

 

First Published on: March 14, 2022 8:02 PM
Exit mobile version