रस्ते कामातील बाधितांचे तातडीने पुनवर्सन करावे

रस्ते कामातील बाधितांचे तातडीने पुनवर्सन करावे

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील उथळसर प्रभाग समितीमधील के-व्हीला पूल ते पंचगंगा दरम्यान नाल्यावर 676 मी. लांबीचा पूल तयार करुन मिसिंग लिंक बांधण्यात येणार आहे. या पुलामुळे के-व्हीला राबोडीमार्गे कळवा- साकेतकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होणार असून रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. यामध्ये बाधित होणार्‍या नागरिकांचे पुनवर्सन तातडीने करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी (बुधवारी) झालेल्या बैठकीत संबंधितांना दिल्या. तसेच या ठिकाणी फॅनिंग पध्दतीने रस्ता तयार केल्यास वाहतूक अधिक सुरळीत होणार असल्याने यासाठी आवश्यक असलेली जागा कारागृह विभागाकडून ताब्यात घेण्याबाबतही तातडीने पत्रव्यवहार करण्याच्या सूचना शहरविकास विभागास यावेळी आयुक्तांनी दिल्या.

या ठिकाणी बांधण्यात येणार्‍या पुलाच्या कामाअंतर्गत कारागृहाकडील भागात पायाभरणीचे काम तसेच नाल्याच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले असून राबोडीकडील बाजूस एकूण 424 बांधकामे बाधित होत आहेत, त्यापैकी 276 बांधकामाचे पुनवर्सन करुन त्या ठिकाणी काम सुरू असल्याची माहिती बैठकीत सादर करण्यात आली. उर्वरित जागेवरील अंदाजे 150 बांधकामे बाधित होणार असून अंदाजे 50 बांधकामांना तात्पुरते स्थलांतरीत करणे गरजेचे आहे, याबाबत सर्वेक्षण करुन कोणत्या ठिकाणी तातडीने घरे उपलब्ध करुन त्यांचे पुनवर्सन करणे शक्य आहे याबाबतची पडताळणी करुन येथील नागरिकांचे पुनवर्सन करण्याच्या सूचना उपायुक्त स्थावर मालमत्ता विभागास आयुक्तांनी दिल्या.

या उर्वरित काम संबंधित ठेकेदारामार्फत तातडीने सुरू करावे अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास यावेळी देण्यात आल्या. शहरामध्ये होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मिसिंग लिंक स्थापित करण्याचे काम महानगरपालिका तसेच इतर शासकीय संस्थांच्या मार्फत विविध ठिकाणी सुरू आहे, पैकी के-व्हीला पूल ते पंचगंगा ही अत्यंत महत्वाची मिसिंग लिंक असून या पुलाचे काम पुर्ण झाल्यानंतर तो परिसर कोंडीमुक्त होण्यास मोठ्या प्रमाणावर हातभार लागणार आहे. बाधित नागरिकांचे पुनवर्सन केल्यानंतर सदर पुलाच्या कामास गती येईल. साधारणत: सप्टेंबर 2024 पूर्वी हे काम पुर्ण होणे अपेक्षित असल्याचे आयुक्त बांगर यांनी नमूद केले. या बैठकीस नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, उप नगरअभियंता विकास ढोले, कार्यकारी अभियंता संजय कदम, मोहन कलाल आदी उपस्थित होते.

First Published on: December 15, 2023 10:21 PM
Exit mobile version