TMC : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणार नवी पाठ्यपुस्तके

TMC : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणार नवी पाठ्यपुस्तके

TMC : ठाणे : येत्या गुरूवारी म्हणजे 15 जूनपासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या नवीन पाठ्यपुस्तकांचे शाळांमध्ये वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशीच नवी कोरी पुस्तके हातात मिळणार आहेत, तर दहावीच्या विद्यार्थ्यांना यापूर्वीच पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. (TMC : Good news for students; New blank textbooks will be available on the first day of school)

नवीन वर्षासाठी पाठ्यपुस्तके शाळा सुरू होण्यापूर्वी उपलब्ध करून देण्याबाबत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर (Abhijeet Bangar) यांनी शिक्षण विभागाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, समग्र शिक्षण अभियान अंतर्गत महापालिकेच्या दोन्ही शहरी साधन केंद्रांना पहिली ते आठवी इयत्तेची माध्यम निहाय नवीन रचनेची पाठ्यपुस्तके आणि नववीच्या पुस्तकांचे संच गेल्या आठवड्यात मिळाले. ही पुस्तके शहरी साधन केंद्रांनी त्यांच्या अंतर्गत असलेल्या समूह साधन केंद्रांना पाठवली. आता या केंद्रांच्या मार्फत ती पुस्तके शाळांना वितरण करण्याचे काम सुरू झाले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील पाठ्यपुस्तके मिळण्यास पात्र अशा एकूण 324 शाळा आहेत. त्यात महापालिकेच्या सर्व शाळा, खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांचा समावेश आहे. त्यात एकूण ६७ हजार ७२४ विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी ‘बालभारती’कडून दोन लाख 99 हजार 281 पुस्तके महापालिकेस मिळाली. यामध्ये महापालिकेच्या प्राथमिक शाळांत 28 हजार 694 तर माध्यमिक शाळांमध्ये 4099 विद्यार्थी आहेत. पहिली ते आठवीसाठी नवीन रचनेची पुस्तके, तसेच, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना जुन्या रचनेची नवीन पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांना यापूर्वीच पुस्तके वितरित करण्यात आली आहेत.

नवीन रचनेची पाठ्यपुस्तके
पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी व्हावे म्हणून राज्य सरकारच्या धोरणानुसार सर्व विषयांसाठी एकच पुस्तक चार भागात तयार करण्यात आले आहे. पाठ्यक्रमानुसार निश्चित केलेला भाग विद्यार्थ्यांना त्या-त्या वेळी वापरता येईल. तसेच, या पाठ्यपुस्तकात ठळक नोंदी करण्यासाठी प्रत्येक धड्यानंतर कोरे पान ठेवण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे दप्तर ओझे काही प्रमाणात कमी होईल.

डीबीटी तत्काळ करावी
ठाणे महापालिकेच्या शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये वह्या, पेन्सिल, पेन, खोडरबर, शार्पनर, कंपॉस बॉक्स, पट्टी, दप्तर, लंच बॉक्स, वॉटर बॉटल आणि रेनकोट खरेदीसाठी अनुदान निश्चित करून देण्यात आले आहे. तसेच, बालवाडीतील विद्यार्थ्यांना लंच बॉक्स आणि वॉटर बॉटल खरेदीसाठी अनुदान निश्चित करून देण्यात आले आहे. त्याची माहिती शाळांना देण्यात आली आहे. या योजनेत विद्यार्थ्यांनी निश्चित केलेल्या अनुदानाच्या मर्यादेत शैक्षणिक साहित्याची खरेदी करून त्याची देयके शाळांमध्ये सादर करावीत. ही देयके मुख्याध्यपकांमार्फत शिक्षण विभागाकडे आल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर निश्चित केलेली अनुदानाची रक्कम वर्ग करण्यात येईल. ही रक्कम प्राधान्याने जलद देण्यात यावी, अशा सूचना महापालिका आयुक्त बांगर यांनी केल्या आहेत.

First Published on: June 13, 2023 9:31 PM
Exit mobile version