ठाण्यात परराज्यातील रुग्णांवर आपुलकीने उपचार

ठाण्यात परराज्यातील रुग्णांवर आपुलकीने उपचार

जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्ह्यातीलच नागरिकांवर नाही तर परजिल्ह्यातून किंवा परराज्यातून उपचारार्थ आलेल्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यातच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ठाणे विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयात ठाणे आणि पालघर या जिल्ह्यातील नागरिकांसह उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात व झारखंड या चार राज्यांबरोबर महाराष्ट्रातील तब्बल १५ जिल्ह्यांच्या बरोबरीने मुंबईसारख्या उपनगरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांमध्ये कोणताही दुजाभाव न करता दाखल करून औषधोपचार केले. नेहमीच माणुसकीचे दर्शन घडणार्‍या जिल्हा रुग्णालयाने कोरोना कालावधीत कळत नकळतपणे आपली परंपरा कायम ठेवली आहे, हे विशेष.

१५ मार्च ते २२ एप्रिल दरम्यान एकूण १ हजार ०९२ जणांना उपचारार्थ दाखल केले. त्यामध्ये परजिल्ह्यासह परराज्यातील ११२ जणांचा समावेश आहे. त्यातच ० ते ३० वयोगटातील अवघे २३७ कोरोना रुग्ण होते. उर्वरित ८५५ कोरोना रुग्ण हे ३० पुढील वयोगटातील आहेत.

मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला. एकप्रकारे जणू त्सुनामी सारखी लाट आली. बाधितांची संख्या वाढल्याने रुग्णालयातील बेड्स कमी पडू लागले. बेड्स मिळविण्यासाठी धावाधाव सुरू झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांनी सुरू केलेले कोविड सेंटर हाऊस फुल होऊ लागले, त्याचबरोबर ज्या खासगी रुग्णालयांना कोविड सेंटर करण्याची परवानगी दिली तेही भरू लागले. कुठेच बेड्स उपलब्ध होत नाहीत म्हणून नागरिकांनी शासकीय रुग्णालयात बेड्साठी धाव घेतली. जरी रुग्णालय ३०० बेड्सचे असले तरी रुग्णालय प्रशासनाने आलेल्या प्रत्येकावर उपचार झालेच पाहिजेत या उद्देशाने बेड्स उपलब्ध केले. वेळप्रसंगी रुग्णांसाठी जमिनीवर गाद्याही घालून त्यांच्यावर उपचार करून त्यांचा जीव वाचवला. अशाप्रकारे १५ मार्च, २२ एप्रिल २०२१ दरम्यान १०९२ कोरोनाबाधित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. त्यामध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ९८० जणांचा समावेश आहे.

यामध्ये सर्वाधिक ४२० रुग्ण हे ठामपामधील आहेत. ठाणे ग्रामीण २०७, कल्याण-डोंबिवली- १२५, भिवंडी-७५, बदलापूर-५३, अंबरनाथ-४०, उल्हासनगर-३०, नवी मुंबई-१६, मीरा-भाईंदर-०१ , पालघर-०८ आणि वसई- विरार-०५ यांच्या समावेश आहे. तर उत्तर प्रदेश -०४, आंध्र प्रदेश, गुजरात आणि झारखंड येथील प्रत्येकी १ अशा सात परराज्यातील नागरिकांवर उपचार करण्यात आले. तसेच मुंबईसारख्या महानगरी असलेल्या बृहन्मुंबई येथील ६१ रुग्णांसह रायगड (पनवेल) -१२, जळगाव-०७, पुणे-०५, रत्नागिरी-०३, सिंधुदुर्ग- सातारा, औरंगाबाद, बुलडाणा, धुळे,परभणी येथील प्रत्येकी दोन तर उस्मानाबाद, कोल्हापूर, नांदेड,सांगली या ठिकाणी प्रत्येकी १ असे एकूण ११२ कोरोनाग्रस्तांना वेळीच उपचार देण्याचे धाडस केले. त्यामुळे जिल्ह्यात कोणालाही रस्त्यावर तासांवर ताटकळत किंवा जीव सोडण्याची वेळ ओढवली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या वर्षभरापासून जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्यासह निवासी डॉ. अशोक कांबळे, नेत्रशल्य चिकित्सक डॉ. शुभांगी आंबाडेकर व डॉ. प्रसन्न देशमुख, डॉ. विलास साळवे, डॉ. प्रियांका महांगडे, डॉ. रुची कुलकर्णी, डॉ. नेताजी मुळीक, डॉ. अर्चना आखाडे, डॉ. सचिन घोलप, डॉ. श्रीजीत शिंदे, डॉ. प्रसाद भंडारी, डॉ. अर्चना पवार तसेच मेट्रन प्रतिभा बाबू व वर्षा नलावडे यांच्यासह सर्वजण पडेल ती जबाबदारी निष्ठेने पार पाडताना दिसत आहेत.

‘कोरोना कालावधीत खरी गरज मदतीची होती. त्याप्रमाणे येणार्‍या प्रत्येक रुग्णाला मदतीचा हात दिला. २०० बेड्सचे रुग्णालय ३०० बेड्सचे जिथे जागा उपलब्ध होईल तेथे उपचार केले. अशाप्रकारे बेड्स उपलब्ध करून दिले. यावेळी रुग्ण कोणत्या जिल्ह्यातून किंवा राज्यातून आला असा दुजाभाव न ठेवता. येणार्‍या प्रत्येकावर उपचार केले. महाराष्ट्रातील नाहीतर गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, झारखंड या राज्यातील लोकांवर उपचार केले. तसेच मुंबईतून आलेल्या रुग्णांना दाखल करत त्यांच्यावर उपचार केले.’- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे.

* वयोगटातील उपचारार्थ दाखल रुग्णांचा तक्ता
वयोगट पुरुष स्त्रिया
० ते ०५ २२ १६
०५ ते१२ ०३ ०३
१२ ते २० १४ २८
२० ते ३० ६३ ८८
३० ते ४० १२७ ७९
४० ते ५० ११९ ७९
५० ते ६० ९४ ८९
६० ते ७० १०५ ६४
७० पुढील ६४ ३५
एकूण ६११ ४८१

First Published on: May 2, 2021 5:45 AM
Exit mobile version