सोमवारी आणखी दोघे येऊरच्या नील तलावात बुडाले

सोमवारी आणखी दोघे येऊरच्या नील तलावात बुडाले

येऊरच्या पटोनापाडा येथील नील तलावात रविवारी वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये दोघे बुडाले असताना, त्या घटनांना चोवीस तास होत नाही तोच सोमवारी सकाळी आणखी दोघे जण त्याच नील तलावात बुडाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यातील एकाचा मृतदेह मिळून आला असून दुसर्‍याचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकार्‍यांनी दिली. तसेच ठाणे शहरात दोन दिवसात चार घटनांमध्ये पाच जण बुडाले असून एक जण बचावला आहे. या चार घटनांची वर्तकनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अशाप्रकारे पाण्यात बुडण्याचे सत्र ठाण्यात सुरू असल्याने शहरात हळहळ आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

वर्तकनगर आणि समतानगर येथील तेजस प्रमोद चोरगे (१७) आणि ध्रुव कुळे (१७) तसेच त्याचे हिमांशू वाघ, सोहम करंदीकर, दीप म्हात्रे,आर्यन कलगुटकर, अथर्व आवते असे ७ युवक येऊरच्या नील तलावात सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पोहण्यासाठी गेले होते. तेथे पोहत असताना सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास तेजस आणि ध्रुव या दोन मित्रांना पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच ठामपा आपत्ती आणि अग्निशमन या विभागासह वन विभाग आणि वर्तकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बुडालेल्या दोघांच्या मृतदेहाचा शोध घेण्यास सुरुवात केल्यावर अडीच वाजण्याच्या सुमारास तेजस याचा मृतदेह मिळून आला. तातडीने तो मृतदेह पोलिसांच्या उपस्थितीत शवविच्छेदनासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे पाठवण्यात आले आहे. तसेच ध्रुव याच्या मृतदेहाचे शोधकार्य सुरू आहे, अशी माहिती आपत्ती कक्षाप्रमुख संतोष कदम यांनी दिली.

First Published on: June 22, 2021 3:45 AM
Exit mobile version