पादचार्‍याला लुटणारे दोघे जेरबंद

पादचार्‍याला लुटणारे दोघे जेरबंद

तुम्ही हातात घातलेल्या अंगठीत दोष आहे. तो दोष असल्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे, असे सांगून कल्याणमधील एका पादचार्‍याला बोलण्यात गुंतवून त्याच्याकडील दोन्ही अंगठ्या घेऊन पसार झालेल्या दोघांना डोंबिवली पोलिसांनी अटक केली आहे . पादचार्‍यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तूंची लूट करणार्‍या या जोडीने अशा पद्धतीने आणखी दोन जणांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.मेहमुद अस्लम शेख (40 ) आणि आयुब ताज शेख (50) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

तीन एप्रिल रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास शहाड येथील सद्गुरू अपार्टमेंटमध्ये राहणारे हनुमंत भिमराव गोसावी (56) हे डोंबिवली पूर्वेकडील टिळक चौकातील अनिल मेडीकल स्टोअर्सकडे जात होते. इतक्यात दोन अनोळखी इसमांनी त्यांना रस्त्यात थांबवले. हनुमंत यांनी बोटात घातलेल्या सोन्याचे अंगठीत काहीतरी दोष आहे. तो दोष काढण्यासाठी हातातील अंगठी दाखवा, अंगठीतील दोष काढावा लागेल, असे सांगून या भामट्यांनी त्यांच्याकडील सोन्याची अंगठी काढून घेत त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. त्यानंतर ही जोडी तेथून पसार झाली. या प्रकरणी हनुमंत गोसावी यांनी डोंबिवली पोलिस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तांत्रिक कौशल्य वापरून या दोन्ही भामट्यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली. त्यांच्याकडून एकूण 1 लाख 47 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून 2 गुन्हे देखिल उघडकीस आणले. त्यांना कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने या दोघा आरोपींना अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली.

First Published on: April 17, 2023 10:26 PM
Exit mobile version