मुरबाडमध्ये विनापरवाना बेसुमार वृक्षतोड

मुरबाडमध्ये विनापरवाना बेसुमार वृक्षतोड

तालुक्यात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतील कोटीच्या कोटी वृक्षारोपण कार्यक्रम अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले आहे. परंतू तालुक्यात मोठ्या प्रमाणात विनापरवाना वृक्षतोड होत आहे. वनाधिकारी व कर्मचारी या तोडीकडे सार्थ डोळेझाकपणा करून वन संरक्षण कायद्यांची पायमल्ली करीत असताना दिसत आहेत. दरवर्षी वन मंत्रालयाच्या आदेशानुसार मुरबाड मध्ये विविध सांप्रदाय, सामजिक संघटना कोटीच्या कोटी वृक्षारोपण करीत आहेत. मागील दोन वर्षात चारही विभागात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली आहे. परंतु या लागवडीकडे वनाधिकारी व कर्मचारी यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांचे संवर्धन होऊ शकले नाही. त्यामुळे शासनाचा वृक्षलागवड अभियानाच्या जाहिरात, कार्यक्रम, साहित्य, नर्सरी निर्मिती यासाठी झालेला खर्च मातीत गेला आहे. परंतू नैसर्गिक जंगलात उपजलेल्या मोह, आंबा, जांभूळ, खैर, ऐन, साग, धावरा, या वृक्षांची प्रचंड तोड केली जात आहे. जंगल ठेकेदार एका दोन सर्वे नंबर ची खातेदारांच्या नावाने परवानगी घेऊन आजूबाजूच्या जमिनीवरील विनापरवाना वृक्षतोड करीत आहेत.

टोकावडे दक्षिण हद्दीत मोडणार्‍या आणि अभयारण्यक्षेत्रा जवळील आदिवासी जमिनी वरील कोळोशी दुधनोलीच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बेसुमार सागवान वृक्षतोड नागरिक उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. वन विभाग बघ्याची भुमिकेत असल्याने ही वृक्षतोड थांबविणार कोण या जंगलाचे रक्षकच भक्षक बनल्याचा प्रश्न प्रत्येकाला भेडसावतो आहे. यामुळे आजच्या घडीला येथे केवळ जंगलराज सुरू आहे.

तालुक्यातील दुधनोली-कोळोशी येथील आदिवासी बांधवांच्या मालकीच्या जमिनीवरील सागवान वृक्षतोड ठेकेदाराने केली असून या मालाची विक्री ही वनाधिकार्‍यांच्या संगनमताने केली आहे.याबाबत मी सहाय्यक वनसंरक्षक ठाणे यांच्याकडे रितसर तक्रार दाखल केली आहे.
-शेखर भोईर, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य

माझ्याकडे आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करेल.
-संतोष डगळे, प्रभारी सहाय्यक वनसंरक्षक, ठाणे

First Published on: December 26, 2023 10:27 PM
Exit mobile version