गोवर रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढवावी

गोवर रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढवावी

ठाणे जिल्ह्यात गोवर रोगाचा प्रभाव कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने सतर्कता बाळगावी. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध आहेत. ज्या ठिकाणी संशयित रुग्ण आढळतात तेथे सर्व्हे करावा आणि विशेष लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सोमवारी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला दिले.

गोवर रोगासंबंधी उपाययोजनांसंदर्भात जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा, महापालिका, नगरपालिकांचे वैद्यकीय अधिकारी यांची तातडीची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी शिनगारे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्यासह जिल्ह्यातील विविध नगरपालिका, महानगरपालिका व ग्रामीण आरोग्य यंत्रणांचे वैद्यकीय अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. गोवर रोगाची सध्याची जिल्ह्यातील परिस्थिती काय आहे याची माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी घेतली.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध
शिनगारे म्हणाले की, गोवर रोगाची व्याप्ती वाढू नये यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे. संशयित बालकांची तातडीने चाचणी करून नमुने प्रयोगशाळेत पाठवावे. तसेच ज्या भागात असे रुग्ण आढळले तेथे जास्त लक्ष द्यावे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे साधारणपणे लसीचा भरपूर साठा उपलब्ध आहे. त्यामुळे आवश्यक तेथे लस पोचविण्यासाठी व्यवस्था यंत्रणेने करावी. लसीकरणात कुठलीही कमतरता ठेवू नये. किती बालकांना लस अद्यापपर्यंत दिली नाही, त्याची माहिती अद्ययावत ठेवून त्यांच्यापर्यंत लस पोचेल याची व्यवस्था संबंधित आरोग्य यंत्रणेने करावी. लसीकरणासदंर्भात पालकांची जनजागृती करावी. डॉ. परगे म्हणाले की, जिल्ह्यात गोवर लसीची कमतरता नाही. जेथे लसीकरण झाले आहे, त्या ठिकाणी गोवरचे संशयित रुग्ण कमी आढळले आहेत. त्यामुळे लसीकरणाचे विशेष शिबिराचे आयोजन करावे. गोवर रुग्णांच्या उपचारासाठी भिवंडी येथे वॉर्ड तयार ठेवण्यात आले आहे.

जिल्ह्यात लसींची नाही टंचाई
जिल्ह्यात लसींची कुठलीही टंचाई नाही. मागणीनुसार लसींचा पुरवठा करण्यात येईल. गोवर संसर्गाच्या बालकांसाठी भिवंडीतील आयजीएम, कळवा रुग्णालय तसेच ठाण्यातील पार्किंग प्लाझा येथे विशेष वॉर्ड तयार करण्यात येतील. रोगाच्या संशयित बालकांना व्हिटॅमिन एचे डोस द्यावेत. तसेच अंगावर पुरळ व ताप असणार्‍या बालकांना विलगीकरणात ठेवण्यासाठी तयारी करावी. ज्या भागात संशियत जास्त आढळतात तेथे तातडीने सर्वेक्षण सुरू करावे, अशा सूचना डॉ. पवार यांनी यावेळी दिल्या.

First Published on: November 21, 2022 10:47 PM
Exit mobile version